फैजपूर पोलिसांची कामगिरी : गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त
फैजपूर- शहरापासून जवळच असलेल्या पिंपरूळ फाट्याजवळ गुरुवारी, 19 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिनेस्टाईल ट्रकचा पाठलाग करून ट्रक चालकास लुटण्यात आले होते. या गुन्ह्या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी भुसावळसह पाडळसे येथील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भावेश हेमंत फालक (19, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ), हर्षल रवींद्र पाटील (23, आनंद नगर, भुसावळ), घनश्याम शिरीष चौधरी (23, पाडळसा), भरत मेघश्याम चौधरी (19, पाडळसा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मारहाण करीत ट्रक चालकास लुटले
राजस्थानमधील किसनगड येथील सुरेंद्र जीवन सिंह (26) हे आपले साथीदार हरजीत सिंह सोबत आयशर ट्रक (आर.जे.02 जी.बी.3768) ने भुसावळकडून सावदा जात असतांना पिंपरुळ फाट्याजवळ आधीच स्कार्पिओ गाडी घेऊन दबा धरून बसलेल्या चौघांनी सुरुवातीला ट्रक चालकाला हात दिला मात्र ट्रक चालक न थांबल्यामुळे या चौघांनी ट्रकचा पाठलाग करत स्कार्पिओ गाडी रस्त्यावर आडवी लावून ट्रक चालकाला गाडी का थांबवली नाही ? म्हणून जाब विचारत मारहाण केली व आरोपींनी ट्रक चालक व त्याच्या साथीदाराचा मोबाईल तसेच ट्रकमधील सात हजार रुपयांची रोख रक्कम असा 13 हजार 10 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. शिवाय एवढ्यावरच आरोपींचे समाधान झाले नाही तर ट्रक चालकाचा सोबती हरजीत सिंह यास सोबत स्कार्पियोमध्ये जबरदस्तीने बसवून भुसावळ येथे घेऊन गेले त्यानंतर एका एटीएमच्या समोर गाडी थांबवून हरजीत याला पैसे काढण्यास सांगण्यात आले मात्र हरजीतने पैसे न काढल्यामुळे त्याला पुन्हा गाडीमध्ये बसवत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला पिळोदा शिवारात आणून सोडत तेथे जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेची खबर पोलिसांना रात्रीच ट्रक चालकाकडून मिळताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून रस्ता लुट करणार्या चौघांना ताब्यात घेत गुन्ह्यातील स्कार्पिओ गाडी व न दोन मोबाईल जप्त केले.
यांनी केली कारवाई
डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉन्स्टेबल इकबाल सय्यद, उमेश पाटील रमण सुरळकर, योगेश महाजन यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या ट्रक चालक सुरेंद्र सिंह यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी भेट दिली.