भारतीय मूळ असलेल्या मनीषा सिंह या तरुण स्त्रीला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात महत्त्वाच्या प्रशासकीय पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी याचे सूतोवाच केले आहे. या पदावर नियुक्ती झाली तर त्यांना आर्थिक कूटनीतीची जबाबदारी देण्यात येईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
मनीषा सिंह या सध्या सिनेटर डान सुलिव्हान यांची मुख्य सल्लागार आणि वरिष्ठ रणनीती सल्लागार आहेत. सीनेटवरील त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले, तर त्यांना आर्थिक विषयांतील सहाय्यक परराष्ट्र मंत्रीचे पद सांभाळतील. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर चार्ल्स रिव्हकीन यांनी जानेवारी महिन्यात या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिकामे आहे. फ्लोरिडात राहणार्या 45 वर्षीय मनीषा यांनी यापूर्वी ब्यूरो ऑफ इकोनॉमिक, एनर्जी अँड बिझिनेस अफेयर्स येथे उप सहायक सचिव या पदावर काम केले आहे. सीनेट फॉरेन अफेयर्स कमिटीवरही त्यांनी काम केले आहे.