ट्रम्प प्रशासनाच्या आठव्याच दिवशी तिने दिला नोकरीचा राजीनामा

0

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशांवर अमेरिकेतील प्रवेशाचे निर्बंध घालण्याचा निर्णयाचा निषेध करत व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत असणार्‍या एका हिजाबधारी मुस्लिम महिलेने नव्या सरकारच्या आठव्या दिवशीच नोकरीचा राजीनामा दिला. मूळची बांगलादेशाची असलेल्या रुमाना अहमद 2011 पासून व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्शा परिषदेत कार्यरत होती.

ट्रंप प्रशासनाने 27 जानेवारीला इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सूदान आणि यमेनमधील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध घातले होते. या निर्बंधांना सध्या अमेरिकेच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राजीनामा दिल्यावर रुमानाने अमेरिकेतील द अटलांटिक वृत्तपत्रातील लेखातून मनोगत व्यक्त केेले. त्यात रुमाना म्हणाली की वेस्ट विंगमध्ये हिजाब घालून काम करणारी एकमेव महिला होते.

ओबामा यांच्या काळात कधीच असुरक्शित वाटले नाही. पण ट्रम्प प्रशासनात आल्यापासून इतर अमेरिकन मुस्लिमांप्रमाणे मलाही भिती जाणवू लागली. असे असतानाही राष्ट्रपती आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांना इस्लाम आणि अमेरिकन मुस्लिमांबाबत सखोल माहिती करुन देण्यासाठी ट्रंप प्रशासनात नोकरी करावी असा विचार केला होता. पण त्यांनी कार्यभार सांभाळताच चित्र बदलत असल्याची जाणीव झाल्यामुळे सदर नोकरी सोडली.