जळगाव । तरसोद गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील महामार्गावर रविवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी असून जखमीवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. नितीन एकनाथ आमोदेकर (वय-32) असे मयत तरूणाचे नाव आहे.
डोक्याला जबर मार बसल्यामुळे जागीच मृत्यू
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमाळा येथील नितीन आमोदेकर व नशिराबादमधील प्रमोद प्रल्हाद माळी (वय-42) हे जळगावातील औद्यागिक वसाहतीत पाईप बेन्ड कपलर कंपनीत कामाला असल्यामुळे ते सकाळी दोघे दुचाकी क्रं. एमएच.19.2939 ने कंपनीत आले होते. दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास काम संपवून नितीन आमोदेकर आणि प्रमोद माळी हे पुन्हा नशिराबादकडे घराच्या वाटेने दुचाकीने निघाले. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास तरसोद गावाच्या प्रवेशद्वारासमोरील महामार्गावरून जात असतांना समोरून येणार्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात नितीन यांच्या डोक्याला जोरदार मार बसला तर प्रमोद हे फेकले गेले. मात्र, डोक्याला जबर मार बसल्यामुळे नितीन यांचा जागेवरच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. वैद्यकीय अधिकार्यांनी नितीन यांची तपासणी करून मृत घोषित केले तर प्रमोद माळी यांची प्रकृति चिताजनक असल्यामुळे त्यांना उपचारार्थ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघातग्रस्त दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.