सणसवाडी : डिंग्रजवाडी येथील ट्रॅन्टर इंडिया लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात शिक्रापूरमधील कामगारांना बेकायदेशीरपद्धतीने कमी केले आहे. याविरोधात ट्रॅन्टर इंडिया एम्पलॉइज युनियनने आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाने घेतला आहे.
ट्रॅन्टर इंडिया लिमिटेडमधील कामगारांना कमी केल्याबाबत राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाने ट्रॅन्टर इंडिया एम्पलॉइज युनियनची एक बैठक घेतली. भविष्यात संघटनेचा लढा अधिक तीव्र करण्यावर यामध्ये चर्चा झाली. सदर चर्चेमध्ये राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, दत्ताजीराव येळवंडे व पदाधिकारी सहभागी झाले होते. ट्रॅन्टर इंडिया एम्पलॉइज युनियनला एक मताने पाठिंबा देण्यात आला. कामगार प्रश्नाबाबत व्यवस्थापनाने योग्य निर्णय घेतला नाही तर ट्रॅन्टर इंडिया एम्प्लॉईज युनियनचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या 157 विविध कामगार संघटना लढ्यामध्ये सामील होणार आहेत. चर्चा झाल्यानंतर कंपनीच्या गेटवर युनियनचे प्रतिनिधी व कामगार वर्गाने घोषणाबाजी करून कंपनी व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला.