ट्रॅफिक जामच्या समस्येने पुणेकर हैराण

0

मेट्रोच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतूककोंडी

पुणे : वाहनांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढत असताना ट्रॅफिक जामच्या समस्येला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहनचालक आतील रस्त्यावरुन आपली वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्वे रस्त्याच्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर ट्रॅफिक जाम होत असून भर दुपारी उन्हाच्या कडाक्यात अडकून पडावे लागत आहे. सध्या कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रोच्या कामामुळे दोन्ही बाजूंना बॅरिगेट टाकण्यात आल्याने वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे.

अंतर्गत रस्ते आहेत अरुंद

वाहनांची संख्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला या रस्त्यावर अधिक असते. कर्वे रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक अंतर्गत रस्त्यांचा वापर करतात. अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने तसेच छोटे छोटे चौक या ठिकाणी असल्याने अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यात दररोज 700 ते 1000 नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकींची संख्या 36 लाखांवर गेली आहे. असे असताना शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून यामुळे प्रदूषणात देखील मोठी वाढ होत आहे. संध्याकाळी डेक्कन पासून कोथरुडकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांच्य रांगा लागत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर देखील पदपथांचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे.अशीच स्थिती पेठांमधील रस्त्यांवर देखील पाहायला मिळत आहे.