यावल । चोपडा रस्त्यावरील हाजी शब्बीर खान यांच्या तोलकाट्याजवळ स्वामीनारायण कंपनीची ट्रॅव्हल्स बस व अॅपेरिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर 10 जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोपड्यावरून यावलकडे सायंकाळी 7.20 वाजेला स्वामीनारायण ही ट्रॅव्हल्स बस येत होती. त्याचवेळेस यावलवरून कोरपावलीकडे अॅपेरिक्षा जात होती. यावल शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर हाजी शब्बीर खान यांच्या तोलकाट्याजवळ बस ( क्रमांक- एम.एच 28 के.बी 7902 ) च्या चालकाने थुंकण्यासाठी बसचा दरवाजा उघडण्याचा व समोरून अॅपेरिक्षा येण्याचा घात एक झाला. दरवाजाच्या धडकेने रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले या अपघातात अपेरिक्षातील चंद्रकालाबाई देवचंद माळी(60, रा.शिरपूर जि- धुळे), अय्युब रूबाब तडवी ( 40, रा.नायगाव ता.यावल) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी मराबाई पितांबर तायडे (रा.यावल), नागेश तुकाराम अडकमोल , अरमान नथ्यू पटेल, तुळशीराम सुखदेव चव्हाण, रहिम बिसमिल्ला देशमुख, सुनिल घनशाम साळुखे यांच्यासह 10 जण जखमी झाले त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. डॉक्टर नसल्याने यावलच्या रूग्णालयातील कंपाऊडरने उपचार केल्याने नागरिकांचा रोष पाहावयास मिळाला.