ट्रेलरखाली चिरडून भावी डॉक्टराचा मृत्यू

0

जळगाव । शिवकॉलनी रिक्षा स्टॉपसमोरील स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढल्यानंतर मानराज पार्ककडे घरी जाण्यासाठी निघालेल्या भावी डॉक्टराच्या मोटारसायकलीचा महामार्गाच्या साईड पट्टीमुळे तोल जावून नियंत्रण सुटला. यात एरंडोलकडे जाणार्‍या भरधाव टे्रलरने त्याला धडक दिली. धडकेत भावी डॉक्टराचा ट्रेलरच्या खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपजवळ घडली. कुंदन प्रतापराव पाटील (वय-19 रा. मुक्ताईनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, अपघात होताच महामार्गावर वाहतूकीक विस्कळीत झाली होती. तर मुलाला जिल्हा रूग्णालयात मयत स्थितीत पाहिल्यानंतर कुटूंबियांनी मनहेलवणार आक्रोश केला होता. यानंतर जिल्हा रूग्णालयात तरूणाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.

शहरातील मानराज पार्क जवळ असलेल्या मुक्ताईनगरातील रहिवासी डॉ. प्रतापराव पाटील यांचा कुंदन हा एकूलता एक मुलगा होता. डॉ. प्रतापदराव पाटील यांचे पोदार शाळेजवळ जोत्स्नाई हेल्थ केअर सेंटर आहे. तर ते कुटूंबासोबत मुक्ताईनगर येथे राहतात. कुंदन हा धुळे येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. दरम्यान, डिसेंबर 2016 मध्ये गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे तो घरीच होता. कुंदन याला गितीका ही लहान बहिण असून ती मुळजी जेठा महाविद्यालयात 12 वी शिक्षण घेत आहे. अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती वडील प्रतापवराव व आई गायत्री यांना मिळताच त्यांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केल्याचे यावेळी दिसून आले. कुंदन हा मनमिळावू स्वभावाचा तर मित्रांचा लाडका असल्याने मित्रांना देखील कुंदन हा सोडून गेल्याने धक्काच बसला. तर मित्रमंडळींनीही रूग्णालयात एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

अशी घडली घटना
सोमवारी सकाळीच कुंदन हा एमएच.19.सीसी.9799 क्रमांकाची बुलेट घेवून ऋषभ रोहीदास पाटील व कल्पेश अशोक कुदळ या मित्रांसोबत बाहेर गेला. यानंतर ऋषभ हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्यामुळे त्याला आज सायंकाळी ट्रॅव्हल्सने पुण्यासाठी रवाना व्हायचे होते. त्यामुळे कुंदन, ऋषभ, कल्पेश हे तिघे शहरातील संगितम ट्रॅव्हल्स येथे पुण्याचे टिकीत काढण्यासाठी गेले. टिकीट काढल्यानंतर कुंदन याने आपल्या बुलेट मोटारासयकलीवरून ऋषभ याला त्याच्या घरी संभाजीनगर येथे सोडले. यातच वडीलांना डब्बा पाठवायचा असल्याने घरून कुंदनला आईचा फोन आला. त्यामुळे तो घरी जाण्यासाठी तेथून निघाला. महामार्गावरून जात असतांना वाटेतच शिवकॉलनी स्टॉपजवळ स्टेट बँकेचे एटीएम मशिन असल्याने तो तेथे पैसे काढण्यासाठी गेला. पैसे काढल्यानंतर कुंदन हा घराकडे जाण्यासाठी महामार्गावर बुलेट चढवत असतांनाच महामार्गच्या साईड पट्टीमुळे त्याचा तोल गेला बुलेटचे नियंत्रण सुटले. त्या दरम्यान, अंजिठा चौफुलीकडून एरंडोलकडे जाणारा ट्रेलर क्रं. सीजी. 04. जीबी. 6092 हा भरधाव वेगात महामार्गावरून येत असल्याने ट्रॅलरने कुंदनला धडक दिली. यात बुलेट चक्क ट्रेलरच्या चाकांमध्ये अडकली व कुंदन चाकाखाली चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बुलेट चाकाखाली आल्याने कुंदन हा काही अंतरापर्यंत फरफटत गेला होता.

पोलीसांचे मदत कार्य
पोलीस उपअधीक्षक (गृह) महारू पाटील हे ड्रायव्हर व आरटीपीसी विजय माधव काळे यांच्यासोबत तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर मुख्यालयासाठी परतत असतांना शिवकॉलनी स्टॉपवर काही मिनिटापूर्वीच अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी घटनास्थळी जावून मृत्यू पडलेला कुंदन याला नागरिकांच्या मदतीने चाकाखालून बाहेर काढले. यानंतर आरटीपीसी विजय काळे यांनी कुंदन याला रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात मित्रांच्या मदतीन पाठविले. रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. कुंदन हा आपल्याला सोडून गेला ही बातमी मित्रांना कळताच त्यांनाही अश्रू अनावर झाले.

वाहनांच्या लांबच लांब रांगा
ट्रेलरच्या चाकाखाली बुलेट अडकली गेल्याने ट्रेलर हा जागेवरच थांबून होता. यामुळे मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली होती. तर महामार्गावर ट्रंकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले तसेच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे गजानन राठोड हे वाहतुक पोलीस व पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रेलरच्या चाकात अडकलेली बुलेट बाहेर काढून ट्रेलर हा रस्त्याच्या बाजुला उभा करून वाहतुक सुरळीत केली. या अपघातामुळे अर्धा ते एक तास महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती.

अपघाताची मालीका सुरूच
आकाशवाणी चौक ते बांभोरीकडे जाणार्‍या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे़ रस्त्यांच्या साईडपट्टया खोलवर गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी खड्डेदेखील पडलेले आहेत. यामुळे या मार्गावर नेहमी अपघात होत असता. या महामार्गावर आणखी किती जणांचा बळी द्यावा लागेल? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

कुटुंबियांचा आक्रोश
कुंदन याचा मृतदेह अपघात स्थळावरून जिल्हा रूग्णालयात आणले. त्यानंतर कुंदन याचा अपघात झाल्याची माहिती कुटूंबियांना मिळताच त्यांनी जिल्हा रूग्णालय गाठले. मुलाचा मृतदेह पाहताच वडील डॉ. प्रतापराव व आई गायत्री यांनी आक्रोश केला. एकूलता एक मुलगा गेल्याने प्रतापराव यांना धक्काच बसला. तर ते भोवळ येवून खाली पडले. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आल्यानंतर हंबरडा फोडला. मित्र मंडळींनी देखील जिल्हा रूग्णालयात चांगलीच गर्दी केली होती. सायंकाळी कुंदन याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. कुंदन याच्या पश्‍चात आई-वडील, लहान बहिण असा परिवार होता. तर मित्रांमध्ये कुंदन हा सर्वात लाडका व मन मिळावू असल्याने मित्रांनाही कुंदन याचा मृत्यू झाल्याने धक्काच बसला.