सांगली: आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राम जन्मभूमी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भूमिपूजनीची मागणी केली आहे, तर अयोध्येत राम मंदिराची उभारणी केल्याने कोरोना नष्ट होणार नाही असे विधान शरद पवारांनी केले होते. यावरून संभाजी भिडे यांनी टीका केली आहे.
‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे. पवारांच्या सारखी ज्ञानसंपन्न असलेली व्यक्ती असे बोलते हे वाईट आहे. त्यांच्या विधानावरून मला वाईट वाटले. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन भूमिपूजनाचा आग्रह सोडवा. बाबरी मशिदीचे पतन करण्यासाठी शिवसैनिक ऑनलाइन गेले नव्हते. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम नि:संशय चांगलेच असे सांगत शिवसैनिकांनी जाहीरपणे बाबरी मशिद पाडण्यात सहभाग घेतला होता. देशाच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची आहे. हिंदुत्व टिकवणे आणि वाढवण्यासाठी शिवसेना अत्यंत महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
श्रीरामाची मूर्ती मिशी असलेली हवी
अयोध्येत स्थापना होणारी श्रीरामाची मूर्ती मिशी असलेली हवी अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे. सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली.