ठाकूर पिंपरी येथे मादी बिबट्या जेरबंद; जवानांचे थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’

0
शेतात लपून बसलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वन कर्मचार्‍यांना शुक्रवारी रात्री उशिरा पडकण्यात आले यश
माणिकडोह निवारा केंद्रात बिबट्याची रवानगी 
खेड : ठाकूर पिंपरी (ता.खेड, जि.पुणे) येथे लपून बसलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वन कर्मचार्‍यांना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास यश आले. सायंकाळी पाचच्या सुमारास शेतीच्या कामात मग्न असलेल्या शेतकर्‍यांनी या बिबट्याला पहिले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने सायंकाळी सहा वाजता या बिबट्या शोधण्याची कारवाई सुरू झाली. सुरवातीला दोन-तीन वेळा मादी बिबट्याने चकवा दिला. पण नंतर एका मोठ्या कपारीच्या आडोशाला झाडा-झुडपांच्या जाळीत बिबट्या बसल्याची संधी साधत त्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात बिबटा निवारा केंद्राचे जवान यशस्वी झाले. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी बेशुद्धावस्थेतच या मादी बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथील निवारा केंद्रात हलविले.
वन विभागाकडे अनेक तक्रारी
खेड तालुक्यातील कोरेगाव, चांदूस, ठाकूर पिंपरी, लादवड, वडगाव पाटोळे आदी परिसरात शेळी, पारडू अशा अनेक पाळीव प्राण्यांची शिकार बिबट्याने केल्याच्या तक्रारी मागील चार-पाच महिन्यांपासून स्थानिकांकडून वन विभागाकडे करण्यात येत होत्या. बिबट्याला पकडण्यात आलेल्या पिंपरी बुद्रुक व परिसरातल्या गावातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम झाला होता.  अधिक वृत्त असे कि, शुक्रवारी सायंकाळी पाचचे सुमारास ठाकूर पिंपरी येथे शेतात  काम करणार्‍या काही शेतकर्‍यांना हा बलदंड बिबट्या दिसला होता. त्यानंतर याबाबतची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. वनविभागाने तातडीने  जुन्नर बिबट निवारा केंद्राला याबाबतची माहिती दिली. तासाभरात या केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यानंतर हे चित्तथरारक रेस्क्यू सुरु झाले. ही कारवाई रात्री आठच्य सुमारास पूर्ण झाली. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी बेशुद्धावस्थेतच निवारा केंद्रात हलविण्यात आले. पकडण्यात आलेला मादी बिबट्याचे वय चार ते पाच वर्षे असल्याचे चाकण वन विभागाच्या अदिती कोदे व वनपाल पी.एस कासारे यांनी सांगितले.  दरम्यान उसाची शेती, घनदाट वृक्षराजी, ओढे, शिकारीसाठी पाळीव प्राणी अशी बिबट्या पकडण्यात आलेल्या भागाची भौगोलिक स्थिती असल्याने बिबट्यांची संख्या याभागात झपाट्याने वाढत असून लोकवस्तीच्या भागात वावरही वाढत आहे.
तरीही बिबट्या दडून बसलेला 
बिबट्याची बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर नागरिकांनी या भागात मोठी गर्दी केली. त्यामुळे मादी बिबटया दाट झुडपात जाऊन दडुन बसला. मात्र जुन्नर बिबट निवारा केंद्रा रेस्क्यू टीमने सापळा रचला होता. नागरिकांची गर्दी वाढल्याने उडालेल्या  गोंधळात बिबट्या हातातून निसटला तर धोकादायक ठरणार होते. नागरिकांच्या गोंधळाने बिबट्याला स्वतःहून बाहेर पडता येत नव्हते. रेस्क्यु टीमच्या जवानांना बिबट्याला जेरबंद करण्यात झुडपांचा अडसर येत होता. रात्रीचे आठ वाजत आले तरीही बिबटया झुडपातून बाहेर आलाच नाही. अखेरीस बिबट निवारा केंद्राचे डॉ. देशमुख यांनी बिबट्याला झाडांच्या आडून गनच्या साह्याने भुलीचे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुद्ध झाला किंवा नाही हे पाहण्यासाठी रेस्क्यू टीमचे दोन सदस्य जीव धोक्यात घालून पुढे गेले. बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री केली. मगच त्याला निवारा केंद्रात हलविण्यात आले.