ठाणे जिल्हा परिषदेसाठी 13 डिसेंबरला होणार मतदान

0

मुंबई । ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी केली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या 53; तर त्यांतर्गतच्या शहापूर (जागा 28), मुरबाड (16), कल्याण (12), भिवंडी (42) आणि अंबरनाथ (8) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्रनिहाय मतदार यादी 20 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे 23 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील.
नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 23 ते 28 नोव्हेंबर
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 29 नोव्हेंबर 2017
मतदानाची दिनांक- 13 डिसेंबर 2017, निकाल-14 डिसेंबर 2017