कल्याणमध्ये 6 मोटारसायकली जळून खाक
ठाणे : भिवंडी शहरापाठोपाठ आता कल्याणामध्येही दुचाकींना आग लागल्याची घटना समोर आली आहे. कल्याणमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असणार्या 7 दुचाकींना एका अज्ञात व्यक्तीने आग लावली. या घटनेविरोधात मानपाडा पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिनाभरात ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या 9 ते 10 घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण पूर्वेकडील अडवली ढोकली गावत श्री साई हिरा पन्ना सोसायटी नावाची इमारत आहे. येथे स्थानिक रहिवाशांच्या दुचाकी या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवल्या जातात. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने 6 ते 7 दुचाकींना आग लावली. ही बाब नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याबाबतची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली मात्र, तोपर्यंत 6 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. तर 1 दुचाकी अर्धवट जळली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.