ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पादचाऱ्यांना मात्र रस्ता शोधत मार्ग काढण्याची वेळ आली आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात महापालिका व रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे पश्चिमेत स्थानकातून प्रवाशांना बाहेर पाडण्यासाठी स्काय वॉक खालून तीन मार्ग आहेत. या तीनही मार्गावर आसपास फेरीवाले पथाऱ्या पसरून धंदा करताना दिसून येत आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकाला जोडून स्काय वॉक बांधण्यात आला आहे. त्यावर देखील फेरीवाल्यांनी धंदा मांडला आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत दाटीवाटीची स्थिती निर्माण होते. रेल्वे स्थानकातून कल्याण बाजूकडील गेटने स्थानकातून बाहेर पडणाऱ्या रेल्वे प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होण्याचे प्रकार घडत आहेत. या गेटच्या परिसरातही फेरीवाले धंदा लावतात. त्यांच्यामुळे प्रवासी व पादचाऱ्यांना रस्ता शोधात मार्ग काढावा लागत आहे. बाजूनेच जाणाऱ्या टीएमटीच्या बसेसमुळे तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते.
रेल्वे स्थानकातून सीएसटीच्या बाजूने बाहेर पडताना स्काय वॉकखाली तर मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी मिनी बाजारच थाटला आहे. येथेच स्काय वॉक खाली दुचाकीचा वाहन तळ असून त्याला लागुनच फळविक्रेते, ज्यूस विक्रेते यांनी जागा व्यापली आहे. ठाणे पूर्वेतही रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी धंदे लावले आहेत. त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लगतच्या अरुंद रस्ता यामुळे रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. रेल्वे प्रशासन तसेच महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत.