ठाण्यात आठ कंत्राटी कामगारांचे निलंबन

0

ठाणे । एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचार्‍यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने प्रवासांचे अतोनात हाल होत आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत कर्मचारी संपात उतरले असून भिवंडी आगारातून एसटी बाहेर जाण्यास मज्जाव केल्याने कर्मचार्‍यांमध्येच वादंग होऊन चालक व वाहकास दमदाटी करण्याचा प्रकार घडला. यामुळे दोन युनियनमधील वाद उफाळून आल्याने त्यांच्या वादाचा फटका प्रवाशांना बसला आहे. एसटी कर्मचारी संघटनेने वेतन वाढीच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्रीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचार्‍यांनी संप पुकारला. राज्यातील विविध भागांतील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. बेमुदत संप पुकारत भिवंडी बस आगारात संपाचा परिणाम जाणवला. सुमारे 80 टक्के एसटी बसेस आगारात उभ्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या 13 पैकी 6 एसटी बस रवाना झाल्या, तर नजीकच्या पल्ल्यात धावणार्‍या 42 पैकी 12 एसटी बस रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. संपाच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी आगारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

ठाणे आगारातून 50 टक्के वाहतूक
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटी वाहतूक तणावपूर्ण परिस्थितीत सुरळीत सुरू आहे, तर ठाणे आगारातून 50 टक्के वाहतूक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्याच्या खोपट एसटी आगारातही एकूण 383 कायमस्वरूपी कर्मचार्‍यांपैकी 50 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे अनेक एसटीच्या अनेक फेर्‍या रद्द करण्याची वेळ आली. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही. त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचार्‍यांमध्ये संपाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. ठाणे जिल्ह्यातील वाडा, शहापूर, मुरबाड आगारातून सकाळच्या बस सुटल्या. मात्र ठाणे येथून सुटणार्‍या पनवेल, बोरिवली, भाईंदर या जिल्हयातंर्गत होणार्‍या वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

मनसे राज्य परिवहन कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरी माळी यांनी कर्मचारी संघटनेचा अचानक संप हा बेकायदेशीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, युनियनने जर यापूर्वीच कर्मचारी यांच्या वेतनाबाबत ठोस भूमिका घेऊन वेतनवाढ केली असती तर ही नामुष्की ओढवली नसती. मागेही अशाच प्रकारे बेकायदेशीर संप केला. प्रकरण न्यायालयात असताना आणि न्यायालयाने संप करू नका, प्रवाशांना वेठीस धरू नका, असे निर्देश दिल्यानंतरही अचानक संप करून पुन्हा प्रवाशांना वेठीस धरण्यात आले.

नुकसानभरपाई कोण देणार?
मागील बेकायदेशीर संपाच्या दिवसाचे वेतन कर्मचारी यांना मिळवून देण्यात आले नाही अन् पुन्हा संप केल्याने कर्मचारी युनियन ही कर्मचार्‍यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माळी यांनी केला. उद्या कर्मचार्‍यांच्या होणार्‍या नुकसानभरपाई कोण करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.

9 पैकी 8 कंत्राटी कामगार निलंबित
एसटी कर्मचार्‍यांनी पगारवाढीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झाल्यामुळे ठाण्यातील एसटीच्या आठ कंत्राटी कामगारांचे निलंबन करण्यात आले आहे. अवैध ठरवण्यात आलेला हा संप आणि त्यात रोजंदारीवर काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना अशा संपात सहभागी होण्याचा अधिकारच नसल्याचा ठपका ठेवत, एसटी महामंडळाने या सर्वच्या सर्व 8 कामगारांना निलंबित केले आहे. त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं की नाही? हे आता वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवण्यात येणार असल्याची माहिती खोपट एसटी डेपोप्रमुखांनी दिली आहे.