ठाणे । गणेश विसर्जनादरम्यान थर्माकोल आणि निर्माल्याचे प्रमाण यंदा बरेच घटले आहे. ठाणे महापालिकेतर्फे पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाअंतर्गत निर्माल्य जमा केले जाते. महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या प्रयत्नांना यंदा चांगलं यश मिळाले आहे. यंदा थर्माकोलच्या वापरात 90 टक्के तर निर्माल्यातही 40 टक्क्यांची घट झाली आहे. ठाणे महापालिकेने पर्यावरणाबाबत केलेली जनजागृती, फुलांचे कडाडले भाव यातून निर्माल्याचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. गणेशोत्सव काळात समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था महापालिकेच्या सहाय्याने महानिर्माल्य संकलन मोहिम गेली 8 वर्ष राबवत आहे. यंदा पालिकेच्या 12 हून अधिक विसर्जन घाटांवर संस्थेच्या वतीने सफाई सेवक आणि कार्यकर्त्यांची फळी तैनात करण्यात आली होती.
महानिर्माल्य संकलन मोहिमेला यश
घनकचरा विभागाकडून प्रत्येक विसर्जन घाटांवर अविघटनशील कचर्यासाठी 1 तर निर्माल्यासाठी 1 असे दोन ट्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. तर प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे यंदा प्रथमच थर्माकोल संकलन केंद्रही विसर्जन घाटावर उभारण्यात आले होेते. गणेशोत्सवादरम्यान कालपर्यंत 82 टन निर्माल्य संकलित झाले. ठाणे महापालिकेतर्फे पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाअंतर्गत निर्माल्य जमा केले जाते. गेल्यावर्षी हाच आकडा 120 टन होता. यंदाच्या निर्माल्य संकलनात थर्माकोलचे प्रमाण नगण्य होते. यंदा 82 टन निर्माल्य संकलनामध्ये जवळपास 14 टन प्लास्टीकसह अविघटनशील पदार्थ जमा झाले. महानिर्माल्य संकलन मोहिमेला यश मिळत आहे.