ठाणे : बँक ऑफ बडोदाने आपल्या 110 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला रिक्षा चालकांच्या ऑटो रॅलीचे आयोजन केले होते. त्या निमिताने बँकेने 25 महिला रिक्षाचालकांना ऑटो रिक्षासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक नवे पाऊल उचलले. हया कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका नंदिनी विचारे, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक नवतेज सिंग, मुंबई पूर्व क्षेत्र प्रमुख एच. टी. सोलंकी तसेच बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. त्यानंतर मनिषा सौदाणे व विनिता मोरे या दोघींनी रिक्षाचालक झाल्यानंतरचे त्यांचे अनुभव सांगितले. त्यानंतर महाप्रबंधक नवतेज सिंग यांनी ऑटो रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. सदर रिक्षा रॅली ठाणे शहरातील विविध रस्त्यांवरून तलाव पालीमार्गे बँक ऑफ बडोदाच्या ठाणे(पश्चिम) शाखेजवळ समाप्त झाली. ह्या रॅलीच्या निमिताने बँक ऑफ बडोदाने आपल्या विविध बचत योजना तसेच कर्ज सुविधांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. रॅली समाप्तीनंतर बँक ऑफ बडोदातर्फे सर्व महिला रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात आला तसेच गणवेषाचे वाटप करण्यात आले.