ठाण्यात 23 डिसेंबर रोजी रंगणार जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह

0

रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम, सिनेअभिनेत्री अलका कुबलांना गंगा-जमुना पुरस्कार

ठाणे : प्रसिध्द ज्येष्ठ पार्श्‍वगायक रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल महेश केळुसकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रा.प्रदीप ढवळ तर प्रसिध्द अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रविवार,23 डिसेंबर रोजी होणार्‍या जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, कुमार केतकर,आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड.निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढ़वी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे,सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षाशर्मिला रोहीत गायकवाड (पिंपळोलकर), क्रीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर,जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्‍वस्त संजय सावळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.

गंभीर स्वर, भावपूर्ण गायन ही साठे यांची खासियत

दरवर्षी ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला व शिक्षण क्षेत्रात अव्दितीय कामगिरी करणा-या गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यावर्षी स्पष्ट उच्चार, गंभीर स्वर आणि भावपूर्ण गायन ही खासियत असणारे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन,भजन,अभंग अशा सर्व प्रकारात गायन करणारे पार्श्‍वगायक रवींद्र साठे यांनी आपल्या गायनाची एक वेगळी शैली निर्माण केली आहे. सामना, जैत रे जैत, एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले आहे.संगीत क्षेत्रात दिलेल्या या योगदानाबाबत त्यांना यंदाचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम रु. 51 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

घराघरात पोहचलेली अभिनेत्री

प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.माहेरची साडी, लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना,माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभल अशा प्रसिद्ध कौटुंबिक चित्रपटातून घरा-घरात पोहचलेल्या अलका कुबल यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे. रोख रक्कम रु. 51 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल महेश केळुसकर यांना तर शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रा.प्रदीप ढवळ आणि लक्षवेधी कलाकार म्हणून प्रसिध्द सिने अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम रु. 21 हजार आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

कार्यक्रम विनामुल्य

23 डिसेंबररोजी सायंकाळी 5.00 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने रंगाई निर्मित जनकवी पी.सावळाराम यांच्या गीतावर आधारीत धागा धागा अखंड विणूया या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामुल्य असून रसिकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.