महसूल खात्याची डोळ्यावर झापडे : चर्होतील डोंगरच गायब झाले
चिबंळी : पुणे-आळंदी पालखी मार्गाचे रुंदीकरण होत असताना शाश्वत विकासाचे चित्र दिसत आहे. मात्र, या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी या ठेकेदार कंपन्यांकडून शेजारच्या डोंगरांनाच सुरूंग लावला असून डोंगर फोडले जात आहेत. त्यामुळे चर्होतील डोंगरच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे हे उत्खनन हरित पट्टयात होत असून, बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा र्हास होत असताना शासकीय यंत्रणा मात्र डोळ्यावर झापडे लावून बसली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यामुळे येणार्या भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे पुणे-आळंदी पालखी महागाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते. मात्र, अनेक वर्षे रखडलेले हे काम आता तुटकपणे सुरु आहे. मात्र, हे काम सुरु असतानाच या मार्गातील सखल भाग भरुन काढण्यासाठी ठेकेदारांकडून गायरानात राजरोसपणे मुरुम चोरी सुरु आहे. पोकलॅनच्या माध्यमातून हरितपट्टयात हे काम दिवसाढवळ्या सुरु आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करणार्या महापालिकेकडुन ठेकेदारावर फक्त हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविली असताना, महसुल विभागाची याकडे डोळेझाक होताना दिसत आहे.
मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन
पुणे-आळंदी रस्त्यावर बालाजी मंदिर ते गोखलेमळा यादरम्यान मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरु आहे. हे उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले आहे की, मार्गालगतचा डोंगर खोदल्याने वीस फुटांची कडा तयार झाली आहे. पावसाळ्यात ही कडा महामार्गावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणची मागील बाजूस असलेल्या गायरानाची यथेच्छ लचकेतोड करण्यात आली आहे. पालखी मार्गाचा विकास होत असताना, साई मंदिर ते गोखले मळ्यादरम्यान परिसर मात्र भकास होत आहे. शासनाचा कर चुकवून हा प्रकार केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सुरूंगामुळे नागरीकांना त्रास
तर पुण्याकडून आळंदीकडे जाताना याच परिसरात डाव्या बाजुला असलेल्या खाणींची उत्खनन मर्यादा संपली असली, तरी देखील होत असलेल्या सुरूंगांच्या स्पोेटामुळे या परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील पंधरा ते वीस बोअरचे पाणी आटले आले आहे. तसेच उधळणार्या धुळीमुळे शेतजमीन नापिक झाली आहे.
मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात
चर्होली परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननाबाबत मनसेच्या वतीने शासकीय कार्यालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, गेली अनेक दिवसांपासून दिवसांपासून महसुलचा एकही कर्मचारी अथवा अधिकारी चर्होली परिसरात फिरकला नसल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकार्यांनी केला आहे. शासनाची कोट्यावधींची रॉयल्टी बुडत असताना मुरुमचोर मालेमाल झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शुल्लक बाबींवरुन वेठीस धरणार्या महसूल खात्याचे मुरुम चोरीकडे होत असलेले दुर्लक्ष संशयास्पद असल्याचा आरोप मनसेने केला आहे. लागोपाठ आलेल्या शासकीय सुट्टया व इतर कारणे सांगत याठिकाणी भेट न दिल्याने या दिवसांत अनेक ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. याविरोधात मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चर्होली परिसरात लष्कराचा सराव सुरु असतो. या भागात एखाद्या जनावराचा चुकून प्रवेश झाला, तरी देखील पाच हजार रुपये दंड भरुन हे जनावर सोडवून घ्यावे लागते. याशिवाय मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांना देखील या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशाला मज्जाव केला जातो. मात्र, याच क्षेत्रात पोकलॅनसारख्या यंत्राकडून मुरुम उत्खनन केले जात असल्याची बाब लष्करी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच पोलीस, महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची तक्रार केली आहे.
– अंकुश तापकीर, सामाजिक कार्यकर्ते.