ठेकेदारांची बिले अडवून 300 कोटी कसे वाचले?

0

पिंपरी-चिंचवड : पूर्वीच्या राजवटीतील मार्च अखेरीस न केलेल्या कामांची बिले काढण्याची अनिष्ट प्रथा पालिकेत होती. ती भाजपने थांबवली. त्यामुळे 300 कोटी रुपये वाचवले, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, काम केलेल्या ठेकेदाराला बिले द्यावीच लागणार आहेत. मग 300 कोटी रुपये कसे वाचले? हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरवासियांना समजावून सांगावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच सत्ताधार्‍यांनी आपल्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे 300 कोटी रुपये वाचल्याचे मुख्यमंत्र्यांकडून वदवून घेतले असल्याचेही, भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पदाधिकार्‍यांविरूद्धच टक्केवारीची तक्रार
तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री विविध विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त शहरात आले होते. शहरवासियांनी मोठ्या जबाबदारीने भाजपकडे एकहाती सत्ता सोपवली असून, पारदर्शक कारभारासाठी आपण कटीबद्ध आहोत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होतोय. पूर्वीच्या राजवटीतील मार्च अखेरीस न केलेल्या कामांची बिले काढण्याची अनिष्ट प्रथा होती. ती आम्ही थांबवली आहे. त्यामुळे 300 कोटी रुपये वाचवले, असा दावा मुख्यमंत्री त्यांनी यावेळी बोलताना केला होता. पुण्यातील एका नागरिकाने दोन महिन्यापूर्वीच पंतप्रधान कार्यलयाकडे एक लेखी तक्रार केली होती. एक हजार 480 ठेकेदारांची 147 कोटी 56 लाखांची बिले पालिकेतील अधिकार्‍यांनी रोखली असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी तीन टक्के रक्कम मागत असल्याचे त्या तक्रारीत म्हटले होते.

343 कोटीतून 300 कोटी वाचविले?
1 एप्रिल ते 14 ऑगस्ट 2017 या चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष एकूण भांडवली खर्च 188 कोटी 70 लाख तर किरकोळ दुरुस्ती खर्च 27 कोटी 32 लाख एवढा झाला आहे. तर, 31 मार्चनंतर आलेली बिले रोखली. ती अखर्चिक बिले एकूण 147 कोटी 56 लाख इतकी होती. त्यापैकी आजपर्यंत 127 कोटी 139 लाख अदाई झाली आहेत. तर, 20 कोटी 17 लाखाची बिले प्रलंबित आहेत. 1 एप्रिल ते 14 ऑगस्ट 2017 या चालू आर्थिक वर्षात एकूण 343 कोटी 41 लाख एवढी आर्थिक उलाढाल झाली आहे. या एकूण 343 कोटी 41 लाख रकमेतून 300 कोटी वाचवल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. हे गणित काय? शहरवासियांना समजले नाही. पदाधिकार्‍यांनी 1 एप्रिल ते 12 ऑगस्ट 2017 या कालावधीत महापालिकेचे 300 कोटी रुपये कसे वाचवले? असा प्रश्न भापकर यांनी उपस्थित केला आहे.

आपणास खोटी माहिती
आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 300 कोटी महापालिकेचे वाचवले, असे जाहीर वक्तव्य केले. आपल्याला दिलेली माहिती खरी असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. या गैरव्यवहारात सामील असणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना या कटकारस्थान व भ्रष्टचाराबाबत जेलमध्ये टाकले पाहिजे. आपल्याला माहिती देणार्‍या पदाधिकार्‍यांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून आपली दिशाभूल करून समाजाला स्वतः ची प्रतिमा स्वच्छ दाखवण्यासाठी आपल्या तोंडून हे वाक्य वदवून घेतले आहे. आपल्याला खोटी माहिती देऊन फसवणार्‍या पदाधिकार्‍यांची आपण चौकशी करावी, अशी मागणीही भापकर यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.