पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षात विविध कामांसाठी ठेकेदारांकडून अनामत आणि सुरक्षा ठेवीच्या रकमा मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्याने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच तरतूद संपली. अनामत रकमेचे परतावे देणे गरजेचे असल्याने आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराखाली या तरतुदीत 150 कोटीची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
अनामत, बयाणा, सुरक्षा ठेव
महापालिकेतर्फे शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या कामांसाठी अनेक ठेकेदार निविदा भरतात. या निविदा भरताना संबंधित ठेकेदारांकडून अनामत रक्कम, बयाणा तसेच सुरक्षा ठेवीपोटी काही रक्कम ठेवण्यात येते. या रकमेचा परतावा ठेकेदारांना परत करण्यात येतो. महापालिकेच्या सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता ठेकेदार अनामत या लेखाशिर्षावर 150 कोटी तरतूद करण्यात आली होती. 6 जानेवारी 2018 पर्यंत एकूण 147 कोटी 28 लाख रूपये प्रत्यक्ष खर्च झाला. सन 2017-18 च्या सुधारीत अंदाजपत्रकात 100 कोटी वाढ करून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता ठेकेदार अनामत या लेखाशिर्षावर 250 कोटी रूपये तरतूद करण्यात आली होती.
150 कोटी तरतुदीत वाढ
16 मार्च 2018 पर्यंत एकूण 249 कोटी 98 लाख रुपये प्रत्यक्ष खर्च झाला असून 1 लाख 36 हजार रुपये शिल्लक होते. या आर्थिक वर्षात बयाणा व सुरक्षा ठेवीच्या रकमा मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्याने ही तरतूद मुदतीपूर्वीच संपली आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून घेतलेल्या बयाणा व सुरक्षा ठेवीच्या रकमा देणे प्रलंबित होते. मार्च 2018 या वर्षाअखेरीस वाढीव 150 कोटी रूपये तरतूद करणे आवश्यक होते. वाढीव अनामत रकमेसाठी 20 मार्च 2018 च्या महापालिका सभेत उपसूचना सादर करून वाढ करणे शक्य होते. मात्र, ही उपसूचना मंजूर होण्यास सात ते आठ दिवसाचा कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत अनामत परतावा प्रकरणे प्रलंबित ठेवणे योग्य होणार नव्हते. त्यासाठी 150 कोटी रुपये तातडीने देण्यासाठी तरतुदीत वाढ करणे आवश्यक होते.
ऑनलाईन कामकाज चार दिवस राहणार बंद
महापालिकेचे ‘सर्व्हर’ नव्याने डेटा सेंटरमध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे ऑनलाईन कामकाज बंद राहणार आहे. महापालिकेचे बहुतांश कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालते. त्यामध्ये मिळकत कर भरना, पाणीपट्टी, विवाह नोंदणी, परवाना, जन्म-नोंदणी संगणक प्रणाली, निविदा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. ‘सर्व्हर’ नव्याने डेटा सेंटरमध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्वव 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे ऑनलाईन कामकाज चार दिवस बंद राहणार आहे. पालिकेच्या सर्व संगणक प्रणालींशी निगडीत ऑनलाईन कामकाज व त्या अनुषंगिक सर्व ऑनलाईन सेवा बंद राहणार आहेत.
डॉ. अनिल रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठवा
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानी प्रशासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना स्थायी समितीने आयुक्तांना दिल्या आहेत.नगरसेवक विलास मडिगेरी म्हणाले, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी देखील त्यानी अधिकारी आणि पदाधिकार्यांवर अफरतफरीचे आरोप केले होते. त्यानी पालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या चना आयुक्तांना दिल्या आहेत.
महिलांना मोटार चालक प्रशिक्षण
महापालिकेमार्फत महिलांना चारचाकी वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचे उदघाटन रहाटणी तापकीर चौक येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर व महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. सुनीता तापकीर यांच्या पाठपुराव्याने व पुढाकाराने हे प्रशिक्षण सुरु करण्यात आले. यावेळी नगरसेविका सविता खुळे, नीता पाडाळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, सामाजिक कार्यकर्त्या सारिका तापकीर, बाबासाहेब त्रिभुवन, भाजपा शहर उपाध्यक्ष हरेश तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, नरेश खुळे, सुभाष बनकर, छत्रभुज झाडे, संतोष ओझा, शशिकांत करुटे, अजय वाकोडे, अविनाश भंडारे आदी उपस्थित होते.
टीकेनंतर वृक्षप्राधिकरण सदस्यांचा सिक्कीम दौरा रद्द
महापालिकेतील अधिकारी, पदाधिकार्यांच्या वाढत्या दौर्यांवर टीका होऊ लागल्यानंतर वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य आणि अधिकार्यांचा सिक्कीम दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा ठराव मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. समितीतील बहुतांश सदस्यांनी विरोध केल्याने दौरा रद्द केल्याचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.
वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि अधिकारी 3 ते 8 मे दरम्यान सिक्कीमच्या तीन दिवसीय अभ्यास दौ-यावर जाणार होते. या दौ-यासाठी एका व्यक्तीला प्रत्येकी 45 हजार 850 रुपये खर्च अपेक्षित होता. 20 जण दौ-यामध्ये सहभागी होणार होते. या दौ-यासाठी येणा-या नऊ लाख 53 हजार रुपये खर्चाला मागील स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली देखील होती. परंतु, या दौ-यावर टीका होऊ लागली. त्यामुळे सत्ताधा-यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत हा ठराव रद्द करण्यात आला.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या मागील बैठकीत सदस्यांनी दौर्याचे आयोजन करावे, असे सूचविले होते. त्यासाठी सिक्कीम दौरा निश्चित केला होता. परंतु, आज झालेल्या बैठकीत समितीतील निम्या सदस्यांनी दौर्याला नकार दिला. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असून याबाबतचा ठराव देखील करण्यात आला आहे. तसेच स्थायी समितीत देखील हा ठराव रद्द केला जाणार आहे.
-विलास मडिगेरी, समिती सदस्य