पुणे : शेकडो गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आलेल्या डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (डीएसकेडीएल) कंपनीला सेक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्डाने (सेबी)ने नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितला होता. त्याला उत्तर देताना डीएसकेचे कंपनी सचिव रोहित पुरंदर यांनी कंपनी ठेवीदारांच्या ठेवी परत करणार असून, याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागालाही तपासात सहकार्य करत आहोत, असे प्रत्युत्तर दिले आहे. ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी सेबीनेदेखील पाऊले उचलली असून, ठेवी परत करण्यासाठी डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्यावर दबाव वाढविला आहे. दरम्यान, कुलकर्णी दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी सेबीकडून दखल
डी. एस. कुलकर्णी यांनी आपल्या कंपनीच्या व्यवसायासाठी गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारल्या होत्या. या ठेवींवर व्याज देण्याचे आमिषदेखील दाखविले होते. काही महिने व्याज देण्यात आले नंतर मात्र व्याजही मिळाले नाही व ठेवीदेखील परत देण्यात टाळाटाळ करण्यात आली. यामुळे शेकडो गुंतवणूकदारांनी फसवणूकप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्या तक्रारीवरून पोलिसांनी काल डीएसकेंच्या पुण्यातील घर, फ्लॅट आणि मुख्य कार्यालयासह मुंबईतील कार्यालयावरही छापे टाकून काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्याचे विश्लेषण करण्याचे काम सद्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहेत. गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सेबीनेदेखील डीएसके डेव्हलपर्स लि. ला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्या नोटीसला डीएसकेचे कंपनी सचिव रोहित पुरंदर यांनी उत्तर दिले आहे. त्यात ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरु असून, या ठेवी परत केल्या जातील, अशी ग्वाही दिली. तसेच, दाखल गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जात आहे, अशी माहिती सेबीला देण्यात आलेली आहे.
दोन-तीन आठवड्यात प्रश्न सुटतील : शिरिष कुलकर्णी
डीएसकेडीएलचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, संचालिका हेमंती कुलकर्णी व मुख्य आर्थिक अधिकारी यांनी ठेवीदारांकडून खासगी कारणांसाठी ठेवी स्वीकारल्या होत्या, अशी बाब सेबीच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, या ठेवी परत होत नसल्याचेही सेबीला कळविण्यात आले होते. तसेच, या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची खात्री सेबीला पटविण्यात आल्यानंतर सेबीने डीएसकेंना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. हा खुलासा समाधानकारक न वाटल्यास कारवाईचे पाऊलदेखील उचलले जाणार आहे. ठेवीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी डीएसके व हेमंती कुलकर्णी पाऊले उचलत असून, या सर्व तक्रारींचे लवकरच निराकरण केले जाईल, असेही सेबीला डीएसकेंच्या कंपनी सचिवांनी सांगितले आहे. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि डीएसकेंचे चिरंजीव शिरिष कुलकर्णी यांना ठेवीदारांची देणी देण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, असे विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, नेमकी किती वेळ लागेल, हे सांगणे कठीण आहे. तशी वेळनिश्चिती आम्ही केलेली नाही. परंतु, पुढील दोन ते तीन आठवड्यात हा प्रश्न सोडविला जाईल, अशी खात्री वाटते, असे उत्तर त्यांनी दिले. तर कुलकर्णींनी आपणास प्रसारमाध्यमांशी न बोलण्याबाबत सल्ला देण्यात आलेला आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत काहीही बोलणार नाही, असे डीएसके एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले.
तक्रारी दाखल करण्याचे सत्र सुरुच!
सेबीकडे नोंदणीकृत असलेली कंपनी नोटाबंदी, महारेरा व वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अचानक आर्थिक अडचणीत सापडलेली आहे. सुमारे 8 हजार गुंतवणूकदारांकडून या कंपनीने फिक्स डिपॉजिट व इतर ठेवी स्वीकारल्या असून, त्या परत करण्यात येत नसल्याने ठेवीदार आक्रमक झालेले आहेत. तसेच, पोलिसांकडे तक्रारी दाखल करत आहेत. गतवर्षी झालेल्या अपघातानंतर ठेवीदारांनी अचानक ठेवी परत मागण्यास सुरुवात केल्यानेही अडचणी सुरु झाल्याचे काही दिवसांपूर्वीच डीएसकेंनी सांगितले होते.