डंपरची कारला धडक; चौघेजण जखमी

0

जळगाव। जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवतांना प्रशासनाचे नाकी नऊ आले आहे. कडक कारवाई करुन देखील अवैध वाहतुक थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान शनिवारी 17 रोजी जळगाव औरंगाबाद मार्गावरील उमाळा फाट्यानजीक वाळू वाहतूक करणार्‍या डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने जामनेर येथील व्यापारी जितेंद्र बाबुलाल सिसोदिया (वय 42), त्यांची आई सजनबाई सिसोदिया (वय 65), पत्नी नीता सिसोदिया (वय 37), विधी महावीर सिसोदिया (वय 11) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विधी हिच्या डोक्याला जबर मार लागला असून जितेंद्र यांनाही मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून ते बचावले. जामनेर येथील प्रल्हाद बोरसे यांनी जखमींना दुसर्‍या वाहनातून जळगावला रवाना केले. जितेंद्र सिसोदिया हे कुटुंबासह दवाखान्यात नातेवाईकांनी पाहण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला.