भोसरी – येथील डब्लू.टी.ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना एक हजार छत्र्या, टी-शर्ट, टोप्या आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत देखील जनजागृती करण्यात आली. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहिम देखील राबविण्यात आली. दिघीतील मॅगझीन चौकात हा कार्यक्रम पार पडला. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वारकर्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे यांच्यासह कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. वारकर्यांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या कर्मचार्यांनी प्लास्टिक वापर टाळण्याबाबत जनजागृती केली. जनजगृतीचे संदेश असणारे टी-शर्ट परिधान केले होते. याशिवाय मॅगझीन चौक ते दिघीपर्यंत प्लास्टीकच्या जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली. ‘प्लास्टिक हटवा, देश वाचवा’, ‘प्लास्टिक वापरणे सोडा, पर्यावरणाशी नाते जोडा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
प्लास्टिक टाळणे गरजेचे
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर कंपनीतील कर्मचार्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पालखी मार्गावर पडलेले चहाचे कप, केळीची साले असा सर्व प्रकारचा कचरा उचलून रस्ता त्वरित चकाचक केला. कंपनीचे संचालक प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी सुरु आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कंपनीने प्लास्टिक वापर टाळण्याबाबत जनजागृती केली. प्लास्टिकमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वारकर्यांच्या मार्फत प्लास्टिकचा वापर करु नये हा संदेश राज्यातील गावागावात पोहचणार आहे.