ठाणे । डम्पिंग ग्राऊंड असलेल्या आधारवाडी-वाडेघरचा प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाला यश आले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्या दुर्गंधीने आणि होणार्या रोगराईमुळे ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे. प्रश्न सोडविला नाही, तर मत मागायला येणार्याला आमचा ठेंगा पाहायला मिळेल, असा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे. मतदानावरच बहिष्कार टाकू, अशी धमकीच त्रस्त रहिवाशांनी दिली आहे.कल्याणच्या आधारवाडी-वाडेघर परिसरातील रहिवासी डम्पिंगची घाणीने भयंकर त्रस्त झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-भाजप युतीची गेली 20 वर्षे सत्ता आहे. आमदार आणि खासदार याच पक्षांचे आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने रविवारी कल्याणच्या वाडेघर रोडवरील लक्ष्मी मंगल कार्यालयात धगधगते मडम्पिंग ग्राऊंड आणि धुमसते कल्याणफ या विषयावर रोखठोक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर, भाजपचे गटनेते वरुण पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे आणि मनसेचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र पालिका प्रशासानाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्याजागी खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
महिलांनीही केली प्रश्नांची सरबत्ती
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी महापालिकेने उंबर्डे येथे 35 एकर जागा संपादित केली आहे. मात्र उंबर्डे येथे नवीन डम्पिंग ग्राऊंड उभारण्यास तेथील शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा विरोध होत असल्याने आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आजपर्यंत बंद होऊ शकले नाही. केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी उंबर्डे येथे कचर्याचा प्रकल्प उभारण्यास विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन पोटे यांनी केला. विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या पुढाकाराने एका संस्थेने कचर्यावर मोफत प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यातून सत्ताधार्यांना टक्केवारी मिळणार नसल्याने कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा सत्ताधारी प्रशासनाकडून आपण कसल्या अपेक्षा करता? भाजप व सेनेची हा प्रश्न सोडवण्याची अजिबात इच्छाशक्ती नाहीच असा घणाघात मनसेचे पवन भोसले यांनी केला.
सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा
महासभेत जसे आरोप-प्रत्यारोप करता तसे इथे वागू नका. यापुढे या प्रश्नावर काय करणार ते सांगा, अशा शब्दात नागरिकांनी उपस्थित नगरसेवकांना ठणकावले. त्यावेळी उंबर्डे येथे डम्पिंग ग्राऊंड हलविण्यासाठी जो विरोध होत आहे. त्याची जनसुनावणी घेण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण विभागाची परवानगी मिळवावी लागेल. ती परवानगी मिळाल्यानंतर नवीन डम्पिंग ग्राऊंड सुरु करता येईल, असे स्पष्टीकरण भाजपचे वरुण पाटील यांनी दिले. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला कचरा काढण्यासाठी 7 वर्षे लागतील. कोणताच कचरा डम्पिंग ग्राऊंडवर येणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. तरच हा प्रश्न सुटून आपले शहर स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याचे शिवसेनेचे प्रकाश पेणकर यांनी यावेळी सांगितले.