अमळनेर । तालुक्यातील प्र. डांगरी येथे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तलाठी नसल्यामुळे विद्यार्थी व गरजू नागरीकांना दाखल्यासह इतर कामांसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर सन 2015 व 2016 चे अनुदान देखील न मिळाल्यामुळे शेतकर्यांनमध्ये संताप व्यक्त होत आहे. महारष्ट्र शासनाने मुग, उडिद, कापूस विक्रीसाठी सातबारा आवश्यक केला आहे व त्यावर पिकपेरा लावून शेतमाल विक्री करावा लागतो, मात्र तलाठी नसल्यामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत त्याच बरोबर बँक, शालेय कामकाज,रेशनकार्ड आदि बाबीसाठी दाखले लागतात ते देखील मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सन 2015 – 16 या वर्षाचे शासकीय अनुदान देखील गावातील काही शेतकर्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यासाठी शेतकरी अमळनेर तहसील कार्यालयात विचारणा करून देखील ते सक्षम उत्तर देताना दिसत नाहीत येत्या 2 ते 3 दिवसात तलाठी न मिळाल्यास गावकरी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तरी महसूल प्रशासनाने तात्काळ तलाठी निमणुक करावा अशी मागणी प्र. डांगरी येथील ज्ञानेश्वर शिसोदे, रामचंद्र पाटील, प्रवीण शिसोदे, नीलेश शिसोदे यांच्यासह आदींनी केली आहे.