जळगाव : महापालिकेकडून ४२ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. मात्र, कामांना सुरुवात होण्यापुर्वीच महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेवून पैशांची उधळपट्टी केली जात आहे.
हे देखील वाचा
शासनाकडून महापालिकेला नगरोत्थान योजनेअंतर्गंत १०० कोटी रुपये मंजुर झाले असून त्यापैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे घेण्यात आली असून टॉवर चौक ते महाबळपर्यंतचा आणि कोर्ट चौक ते गणेश कॉलोनी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण देखील त्या निधीतून होणार आहे.
रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधीच महापालिकेकडून ज्या रस्त्यांचे नवीन काम होणार आहे. त्याच रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेवून जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील सर्वंच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असतांना, नागरिकांकडून खड्डे बुजविण्याची मागणी होत असतांना मनपा प्रशासन त्याकडे दुर्लंक्ष करीत होते. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अशरक्ष: नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तरी, देखील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत नव्हते, मात्र, नवीन डांबरी रस्ते होणार असतांना मनपाकडून घाईगर्दींने डांबरीकरण मंजुर झालेल्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे ही उधळपट्टी डांबरीकरणाचे काम घेतलेल्या मक्तेदारासाठी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.