डांभुर्णीत तिसरीच्या विद्यार्थ्यास तरुणाकडून अमानुष मारहाण

0

डोळ्यास दुखापत : संशयिताला नेणार्‍या वाहनाची तोडफोड

यावल- तालुक्यातील डांभुर्णी येथे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थी डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत बेशुद्ध आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनवाजेच्या सुमारास उघडकीस आली. गावातीलच एका युवकाने या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. त्यामुळे त्याला पकडून काही ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून त्यास यावल पोलिस ठाण्यात नेत असताना संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड करत पोलिस व संशयितालाही धक्काबुक्की केली. या घटनेने गावात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी रूपेश जयराम कोळी (वय 9) हा मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळेच्या मागील बाजूस डोळे रक्ताने माखलेल्या अवस्थेत बेशुद्ध स्थितीत आढळून आला. ही माहिती काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला प्रमोद ठाकूर यांना दिली. मुख्याध्यापिका व शिक्षकांनी गावातील काही तरुणांच्या मदतीने जखमी रूपेशला गावातील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथे रूपेशच्या आईला बोलावून त्यास तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

जखमी बालकावर जळगावात उपचार
गावातीलच यश चंद्रकांत पाटील (वय 19) यानेच रूपेश कोळीला जखमी केल्याचा संशय पुढे आला. काही जणांनी त्यास रूपेश याच्याशी भांडताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी यश पाटील याला पकडून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हवालदार सुनील तायडे व विकास सोनवणे यांच्या ताब्यात दिले तर जखमी रूपेशवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केली असता दोन्ही डोळ्यांच्या बाजूस गंभीर दुखापत झाली असली तरी बुबुळास इजा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संशयिताला धक्काबुक्की
संशयीत यशला यावल पोलिस ठाण्यात नेण्यासाठी पोलिसांनी डांभुर्णीचे सरपंच पुरुजीत चौधरी यांचे वाहन (क्रमांक एम.एच.19 बी.यू.1470) बोलावले असता या वाहनातून संशयिताला यावलला नेत संतप्त जमावाने गाडीवर हल्ला चढवला. यशला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत वाहनाचे नुकसान करण्यात आले तसेच गाडीत बसलेल्या पोलिस व संशयितालाही धक्काबुक्की करण्यात आली. डांभुर्णीतील या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी पथकासह गावात दाखल झाले. यानंतर त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालून संशयिताला यावलला हलवले.