डांभूर्णीतील शेतकर्‍याच्या शेतातील केळी घड कापून फेकले

0

40 हजारांचे नुकसान ; यावल पोलिसात तक्रार अर्ज

यावल- तालुक्यातील डांभुर्णी येथे एका शेतकर्‍यांच्या शेतातील कापणी योग्य केळीचे घड काही संशयीत डोकेफिरूंनी कापून फेकल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत रविवारी यावल पोेलिस ठाण्यात शेतकर्‍याने तक्रार दिली असून 145 घड कापून सुमारे 40 हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद आहे. डांभुर्णी येथील रहिवाशी सुरेश चिंधु कोळी यांनी यावल पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची डांभुर्णी शिवारात शेती आहे त्यात गट क्रमांक 80/ब मध्ये त्यांनी केळीचे लागवड केली होती व सध्या ती कापणी योग्य झाली आहेे तर सध्या चांगला भाव असल्याने लवकरच ते केळी कापणार होते. दरम्यान शनिवारी दुपारी काही अज्ञात संशयितांनी त्यांच्या शेतातील कापणी योग्य झालेली केळी झाडावरील घड कापून फेकल्याचे त्यांच्या निर्दशनास आले तेव्हा एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 145 केळी घड कापून शेतातचं फेकलेले आढळले तेव्हा सदरील प्रकार त्यांनी डांभुर्णी सहकारी पीक सरंक्षण सोसायटीकडे कळवला व सोसायटी कडून तुषार कोळी व सोपान कोळी या दोन पंच यांच्या समक्ष या शेताचा पंचनामा करण्यात आला आहे त्यात तब्बल 40 हजाराचेे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तेव्हा या पंचनाम्याच्या प्रतिसह रविवारी सुरेश कोळी यांनी यावल पोलिसात तक्रार दिली आहे तर काही संशयीतांची नावे देखील त्यात असल्याचे समजते.