डाऊन सचखंड एक्स्प्रेसला आजपासून रावेर स्थानकावर थांबा

0

प्रायोगिक तत्वावर थांबा ; मध्यप्रदेशात जाणार्‍या प्रवाशांना 27 जुलैपर्यंत दिलासा

रावेर- वाराणसी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ वर वॉशेबल अ‍ॅप्रॉनच्या कामासाठी 15 जून ते 26 जुलै दरम्यान सहा गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर त्यात डाऊन कामायनी एक्स्प्रेसचा समावेश असल्याने रावेर स्थानकावरून मध्यप्रदेशात जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत होती. ‘दैनिक जनशक्ती’ने सोमवार, 11 जूनच्या अंकात रावेर स्थानकावर महानगरीसह सचखंड एक्स्प्रेसला रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते तर उदासीन लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणीही केली होती. रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने बुधवार, 20 जूनपासून रावेर रेल्वे स्थानकावर डाऊन 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. मात्र हा थांबा केवळ कामायनी एक्स्प्रेस सुरू होईपर्यंत (27 जुलैपर्यंत) असणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी सांगितले.

या सहा गाड्या झाल्या रद्द
वाराणसी रेल्वे स्थानकावरील कामामुळे 18 जून ते 27 जुलै दरम्यान अप 11072 वाराणसी-एलटीटी कामायनी एक्सप्रेस, अप 16230 वाराणसी-म्हैसूर एक्सप्रेस (16 ते 26 जुलै पर्यंत), अप 17324 वाराणसी-हुबळी एक्सप्रेस (24 जून, 1, 8, 15 व 22 जुलै रोजी) रद्द करण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील 11071 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्सप्रेस 16 जून ते 25 जुलै दरम्यान, 16229 म्हैसूर-वाराणसी एक्सप्रेस (21, 26, 28 जून तसेच 3, 5, 10, 12, 17, 19 व 24 जुलै) तसेच 17323 हुबळी-वाराणसी एक्सप्रेस (15, 22, 29 व 6, 13 व 20 जुलै) साठी रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.