डाकिण असल्याच्या संशयातून महिलेला विवस्त्र करून मारहाण

धडगाव : महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा देणारी एक लज्जास्पद घटना नंदुरबार जिल्ह्यात समोर आली असून डाकिण असल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. यावेळी तिला चटकेही देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र ही घटना नेमक्या कोणत्या पाड्यावर घडली? पीडिता कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सातपुडा पर्वत रांगेतील घटना
ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओतील बोलीभाषेवरून हा प्रकार सातपुडा पर्वतरांगेत कुठेतरी घडला असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. दया गंभीर प्रकाराची पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंनिसकडून चौकशीची मागणी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संघटनेने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य व केंद्रीय महिला आयोगातही जाणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस विनोद सावळे यांनी दिली.