जळगाव । एमआयडीसीतील ई सेक्टरमधील एका दालमिलमध्ये डाळीचे 27 कट्टे चोरीस गेल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोन तासात कंपनीच्या वॉचमनसह तीघांना अटक केली होती. या तिघांना सोमवारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसीतील इ सेक्टरमध्ये प्रेमचंद राजमल चोरडीया यांच्या मालकीची राज उद्योग नावाची दालमिल असून येथे उडीड व मुगाच्या डाळीवर प्रक्रीया केली जाते. शनिवारी रात्री फेरफटका मारल्यानंतर चोरडीया घरी निघून गेले.
दोन तासातच केली अटक
दुसर्या दिवशी रविवारी सकाळी मुलगा निर्मल आल्यानंतर कंपनीत चोरी झाल्याची माहिती वॉचमन कुलकर्णी यांनी दिल्यानंतर कपंनीतून 27 डाळींचे कट्टे चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर प्रेमचंद चोरडीया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोन तासातच एमआयडीसी पोलिसांनी संशयित डाळ चोर वॉचमन राजाराम सुकदेव पाटील याच्यासह गोकुळ हंसराज राठोड (रा.लोणसांगवी, ता.चाळीसगाव) व शरीफ गफ्फार पटेल (रा.पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) या तीघांना अटक केली आणि चौकशीत तिघांनी चोरी केल्याची कबुली दिली.
डाळ चोरीचे वेगळे फुटेज मिळाले
न्यायालयात कामकाज होवून युक्तीवाद करण्ययात आला. यानंतर न्या. गोरे यांनी तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. तडवी यांनी कामकाज पाहिले. अन्य दालमिलमध्ये डाळ चोरी केल्याची शक्यता आहे. एमआयडीसी परिसरातील एका दालमिलमध्ये डाळची झालेल्या चोरीचे फुटेज मिळाले असून यात या भुरट्या चोरट्यांचा सहभाग आहे की नाही हे पोलिस तपासत आहेत.