पूर्वोत्तर राज्यांत भाजपची मातृसंस्था असलेल्या रा. स्व. संघाचे व्यापक आणि सक्षम असे जाळे निर्माण झाले आहे. गेली अनेक दशके ही माणसे तिकडे प्रचंड विरोधी परिस्थितीत काम करत होती. या कामाचे राजकीय फळ आता त्यांना मिळत असल्याचे दिसून आले. संघाच्या प्रचारकांच्या हत्या झाल्यात, संघाचे नेटवर्क उभे राहू नये, यासाठी प्रचंड प्रयत्न झाले, भीती आणि दहशतीचे वातावरणही निर्माण करून झाले. जातीय आणि धार्मिक विद्वेषाच्या फळ्यांना तोडून संघाने या भागात आपले काम सुरूच ठेवले. आजचा भाजपचा हा विजय खरा तर संघाच्या याच मेहनतीची फलश्रुती मानावी लागेल. त्रिपुरात गेल्या अडीच दशकांची डाव्यांची सत्ता उलथावून लावण्यात भाजपला यश आले. एकेकाळी या राज्यात भाजपला दीड टक्केही मते मिळत नव्हती. आता तब्बल 41 टक्के मतांची बेगमी भाजपने केली आहे. कुणी हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा म्हणत असले, तरी आम्हालाही संघाच्या मेहनतीची फलश्रुती दिसत आहे. कम्युनिस्ट पक्षाला पराभूत करून भाजपने निर्विवाद सत्ता प्राप्त केली आहे, केडरबेस असलेल्या या पक्षाला पराभूत करणे हे केवळ मोदींसारख्या नेतृत्वाला इतके सहजासहजी शक्य नव्हतेच. परंतु, तो चमत्कार घडला. त्याचे श्रेय अर्थातच आता मोदी-शहा या जोडगोळीच्या खात्यात जमा होईल.
1993 मध्ये डावे या राज्यांत सत्तेत आले होते. पश्चिम बंगालनंतर त्रिपुरा हे राज्य डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. हा बालेकिल्ला डाव्यांनी गमावला. पश्चिम बंगालनंतर हे राज्यही हातातून गेल्यानंतर डाव्या पक्षांनी आता खरेतर आत्मचिंतन करायला हवे. त्यांचे अस्तित्व केवळ केरळपुरतेच उरले असून, नजीकच्या काळात तेथूनही डावे नेस्तनाबूत होतील, हे भाकीत आम्ही आजच करत आहोत. या घडामोडीला प्रमुख कारण ठरेल ते म्हणजे या पक्षाला सक्षम आणि जनमानसाला चालेल, असा नेताच नाही. ज्योती बसू इतका समर्थ चेहरा आज डाव्यांकडे उरला नाही. बसू जेव्हा प्रदीर्घकाळ पश्चिम बंगालची सत्ता सांभाळत होते तेव्हा डावे आणि उजवे हे व्यक्तीकेंद्रित नेतृत्वावर घसरले नव्हते. दुर्दैवाने आज ती परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप अन् संघाकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा समर्थ चेहरा आहे. भारतीय जनता मग् ती उत्तर भारतातील असो, दक्षिणेतील असो की ईशान्य भागातील असो तिला एखादा खंबीर, कणखर नायक हवा असतो. या देशात घटनाकारांनी लोकशाही व्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, या लोकशाहीचा आजपर्यंतचा इतिहास तपासला असता हीच बाब प्राकर्षाने निदर्शनास येईल की, या देशात एकचालकानुवर्ती सत्ताकेंद्र वारंवार निर्माण होत गेले अन् लोकांनी याच सत्ताकेंद्रावर आपला विश्वास टाकला. मग् महात्मा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत की आता नरेंद्र मोदी असोत. या भूमिकेला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. डाव्यांकडे मोदींसारखा सक्षम नेता नाही. ते समान नेतृत्वाची भाषा करतात, सामूहिक नेतृत्वाची भाषा करतात. परंतु, ही भाषा जनतेला आवडत नाही. त्यांनी खरेतर या निवडणूक निकालातून योग्य तो बोध घ्यायला हवा. काँग्रेसने मोदींविरोधात राहुल गांधी यांना पुढे आणले. राहुल गांधी यांचे काय व्हायचे ते होईल. कालच्याच निवडणुकीत मेघालयसारख्या राज्याने राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सत्ता काँग्रेसच्या हातात देण्याचा निर्णय घेतला. एकवेळ मोदी किंवा राहुल यापैकी एकजण निवडण्याचा निर्णय जनता घेऊ शकते. परंतु, सामूहिक नेतृत्व वगैरे असले थोतांड जनता स्वीकारत नाही, हाच काय तो या निवडणुकांचा अन्वयार्थ आहे. पूर्वोत्तर राज्यांत तीनपैकी दोन राज्यांत भाजपने चांगले यश संपादन केले आहे. हे यश यासाठी उल्लेखनीय आहे, की तेथे पक्षाने प्रथमच आपले वर्चस्व सिद्ध केले. हा त्यांनी प्रदीर्घकाळ आखलेल्या राजकीय रणनीतीचा परिपाक आहे. त्रिपुरा, नागालॅन्ड आणि मेघालय या तीनही राज्यांत सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला असला, तरी सत्तेच्या सारीपाटावर ते कशी गणिते मांडतात त्यावर सगळे तथ्यांश अवलंबून असेल. आजची वस्तुस्थिती हीच आहे की, डाव्यांचा गड कोसळला आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे अन् राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. त्याचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर दिसून येणार आहेत.
नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खरे तर प्रचंड वादग्रस्त, त्यांचे अनेक निर्णय चुकले आहेत आणि त्याचे दुष्पपरिणाम हा देश भोगतो आहे. देशातील शेतकरी, नोकरदार, कष्टकरी इतकेच काय अगदी व्यापारी आणि उद्योगपतीदेखील मोदींच्या निर्णयाचे बळी ठरत आहेत, तरीही देशवासीय मोदींनाच मतदान करत असतील तर मोदींचा करिष्मा चालतो आणि भाजप केवळ मोदींमुळेच सत्तेत येतो, हे मान्य करण्यास आता हरकत नसावी. भलेही या विजयामागे रा. स्व. संघाचे कष्ट आणि नियोजन कारणीभूत असले तरी प्रथमदर्शनी मोदी यांच्यामुळेच भाजपला सत्तेचा सोपान चढता येतो, हे सूर्यप्रकाशाइतके ठसठसीत सत्य उघड झाले आहे. मोदी यांचा झंजावात पाहता, त्यांच्याभोवती फिरणारा भाजप, त्यानिमित्ताने लोकशाहीने बदललेली वाट यावर यापुढील काळात चर्चा व्हायला हवी. भाजपदेखील एकेकाळी सामूहिक नेतृत्वाची भाषा करत होता. तसे सामूहिक नेतृत्वही या पक्षात दिसून आले. अगदी अटलबिहारी वाजपेयी असतानादेखील या पक्षात सामूहिक नेतृत्वच होते. परंतु, अलीकडे भाजप हा मोदीकेंद्रित बनला आहे. या पक्षाच्या ज्येष्ठांना कोपरा दाखवण्यात आला. अगदी सल्लागारांच्या भूमिकेतही हे ज्येष्ठ कुठे दिसून येत नाही. पक्षात मोदींचाच शब्द चालतो, पक्षाध्यक्ष अमित शहा हे मोदी सांगतील तेच करतात, हे उघड सत्य आहे. त्यामुळे मोदी-शहा जोडगोळीने एक एक करून राज्ये ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. खरे तर मोदी यांना राहुल गांधी हे काही समर्थ पर्याय नाही. परंतु, राहुल यांना पुढे करणे ही काँग्रेसची अगतिकता आहे. जेव्हा व्यक्तिकेंद्रित राजकारण सत्तेची समीकरणे निश्चित करत आहे, तेव्हा सामूहिक नेतृत्वाच्या भानगडीत न पडणे हेच शहाणपणाचे ठरते, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे.
खरे तर अशाप्रकारचे व्यक्तिकेंद्रित राजकारणाची सुरुवातच मुळी काँग्रेसपासून झाली होती. महात्मा गांधी असो की बाळ गंगाधर टिळक असो व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा उगम तेथून झाला. सरदार पटेल असो किंवा नेहरू असोत त्यांनी गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे तर पटेल यांना बाजूला सारून नेहरूंनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. नेहरू गेले तर देशाचे काय? हा प्रश्न विचारण्याइतपत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मानसिकता बनली होती. नेहरुनंतर इंदिरा गांधी यांनीदेखील याच राजकीय वाटेवर चालणे पसंत केले. आज मोदींनी ज्याप्रमाणे भाजप ताब्यात घेतला आहे, अगदी तसेच इंदिराजींनी काँग्रेस ताब्यात घेतली होती. अंतर्गत लोकशाही किंवा सामूहिक नेतृत्व हे निव्वळ थोतांड असल्याचे मोदी आणि इंदिरा गांधी यांनी आपल्या कृतीतून देशाला दाखवून दिले आहे. काळाची पाऊले ओळखून डाव्यांनी आता तरी आत्मचिंतन करावे, असा जाहीर सल्ला यानिमित्ताने त्यांना द्यावासा वाटतो आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधी यांनीदेखील पक्षांतर्गत लोकशाहीच्या भानगडीत न पडता मोदींचाच आदर्श घ्यायला हवा. तसा राजकीय आदर्श म्हणून त्यांनी इंदिराजींचा पर्याय निवडला तरी बेहतरच आहे. काँग्रेसवर निर्विवाद पकड राहावी, अशी इंदिराजींची इच्छा होती. एका परिस्थितीत तर पक्षावरील आपली पकड ढिली झाली की काय? असा त्यांना संशय आला असता, त्यांनी काँग्रेसच फोडली होती आणि थेट स्वतःची इंदिरा काँग्रेस जन्माला घातली होती. याच काँग्रेसच्या काही ज्येष्ठांनी तेव्हा इंदिरा इज इंडिया, असे म्हणत त्यांच्या नेतृत्वाची भलावण केली होती, देशवासीयांनीही इंदिराजींवरच विश्वास टाकला होता. आज असेच काहीसे वातावरण भाजपमध्ये दिसत आहे. मोदी म्हणजेच भाजप, त्यांनी त्यांच्या पक्षावर जी पकड निर्माण केली ती खरेतर इंदिराजींच्याच पावलावर टाकलेले पाऊल म्हणावे लागेल. भविष्यात त्यांच्याच पक्षातील मोदीअनुयायी मोदी इज इंडिया म्हणू नये, इतपत ही पकड दृढ आणि मजबूत आहे. परंतु, लोकांना असे नेतृत्व आवडते. जनता अशाच नेतृत्वाकडे पाहून मतदान करतात, त्यातून या नेतृत्वाने गाढव जरी उभे केले तरी ते निवडून येते, हा ढळढळीत इतिहास आहे. या इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आगामी निवडणुकांची लिटमस टेस्ट
पश्चिम बंगालनंतर डाव्यांची आता पूर्वोत्तर राज्यांतदेखील वाताहत झाल्याचे निकाल हाती आले आहेत. भारतीय लोकशाही अशा एका टप्प्यावर उभी आहे, त्या टप्प्यात विरोधी पक्ष म्हणून सर्वच राजकीय पक्षांची पडझड होत असल्याचे दिसून येते. एकएक करत भारतीय जनता पक्ष राज्ये ताब्यात घेत असेल, तर भविष्यात या देशात एकाधिकारशाही निर्माण होते की काय? अशी भीती निर्माण होईल. अशाप्रकारचे निकाल हे आगामी लोकसभा आणि काही महत्त्वाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट ठरत आहेत.
– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, जनशक्ति, पुणे
8087861982