धुळे । तालुक्यातील अक्कलपाडा डाव्या कालव्यातून आपल्या हक्काचे पाणी मागणार्या शेतकर्यांवर लाठीचार्ज करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या अन्यायाबाबतची वस्तूस्थिती धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मांडली. अर्ध्या तासाच्या या चर्चेनंतर वास्तव समजून घेत शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले, तसे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी या चर्चेअंती सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आधीच दुष्काळ त्यात अठरा दिवस उलटूनही पाणी न मिळाल्याने शेती व स्वतःला जगविण्यासाठी त्यांच्या उत्स्फूर्त भावना स्वाभाविक होत्या. यामागे त्यांचा कोणताही विध्वंसक हेतू नव्हता.या शेतकर्यांवर झालेला अन्यायच आहे. या शेतकर्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी आग्रही मागणी आ.कुणाल पाटील यांनी या भेटीत केली.
तीन वर्षांपासून दुष्काळ
धुळे व साक्री तालुक्याच्या सिमा रेषेवर असलेल्या व धुळे तालुक्यासाठी वरदान ठरणार्या अक्कलपाडा निम्न पांझरा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु सुरू असलेल्या डाव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करून त्यात प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी शेतकर्यांची मागणी आहे. कारण गेल्या तीन वर्षापासून पडणार्या दुष्काळामुळे तालुक्यातील शेती व शेतकरी अक्कलपाडा धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.
आमदार पाटलांच्या मध्यस्थीला यश
आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांचे वाहनही अडवले त्यानंतर पाच शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले. वातावरण अगदी शांत असतांना आंदोलक शेतकर्यांच्या पाठीमागून अज्ञात लोकांनी पोलिसांच्या दिशेने व इमारतीवर दगडफेक केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी लाठाचार्ज केल्याने शेतकरी सैरावैरा पळू लागले. त्यांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबून तब्बल 79 शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली. याबाबतची वस्तूस्थिती आ.कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली.
आ.पाटीलांनी मांडली वस्तूस्थिती
या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील भदाणे, खंडलाय, बांबुर्ले, शिरधाणे प्र.नेर,कावठी, मेहेरगाव, नवलाणे, या गावातील शेतकर्यांनी कोणाच्याही नेतृत्वाशिवाय 18 ऑगस्ट 2016 रोजी सुरत-नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांच्या तीव्र भावना विचारात घेवून कार्यकारी अभियंता यांनी कालव्याचे काम पूर्ण करून 15 दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मात्र कालावधी उलटूनही पाणी न सोडल्याने सुमारे 400 ते 500 शेतकर्यांनी 20सप्टेंबर 2016 रोजी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला होता.