डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण

0

न.पा.फवारणीविषयी उदासिन असल्याचा जनतेचा आरोप
नवापूर : शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गल्लीत, कॉलनीत धूर फवारणी अथवा कीटकनाशक फवारणी करण्याची नागरिक मागणी करीत आहे. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक प्रभागात फवारणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात नगरपालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासिन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरात उन्हाचा कडाका, कधी ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. असे वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. रंगावली नदी किनारी, बेलदारवाडा, देवलफळी, महादेव गल्ली, मच्छी मार्केट, जनता पार्क, मंगलदास पार्क, साई नगरी, प्रभाकर कॉलनी, नाला, झोपडपट्टी या भागात डासांची उत्पत्ती प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. तसेच शहरीभागात खराब झालेले शौचालय, मार्केट आवारात उभ्या केलेल्या गाड्या, साचलेले गटाराचे पाणी, कचरा यावर डासांची पैदास जास्त दिसत आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घराचे दरवाजे, काचा खिडक्या सर्व बंद करून बसावे लागते. गल्ली, नदीकिनारी आठवडे परिसरात विविध व्यापारी संकुलाच्या आवारात आठवड्यातून एक, दोनदा धूर फवारणी किंवा कीटकनाशक फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याविषयी पालिका प्रशासनाकडे विचारणा केल्यावर त्यांनी पालिका उपाययोजना करीत असल्याचे सांगितले.

वातावरणातील बदलाने डासांचे प्रमाण वाढले
प्रत्येक प्रभागाची स्वतंत्र हजेरी शेड असून प्रभागाचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार दर आठवड्याला फवारणी होत आहे. नवापूर शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी करण्याचा आमचा संकल्प आहे. वातावरणात बदल वारंवार होत असतात. त्यात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत आहे.
– हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर

‘बॅट’ विक्रेत्यांची चांदी
आता घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या औषधांनाही ते दाद देत नाहीत. त्यामुळे डासांना मारण्यासाठी इलेक्ट्रिकची बॅट वापरली जाते. त्यामुळे अशा बॅटच्या विक्रीत वाढ झाली असून विक्रेत्यांची चांदी होत आहे. दरदिवशी पाच ते सहा बॅटची विक्री होत असून हे प्रमाण फेब्रुवारीपासून वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बदल्यात हवामानामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने शहरातील लहान बालकांसह वस्ती, झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने उपाययोजना करणे शक्य होत नाही. परिणामी आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे चित्र आहे.