जळगाव । शहरातील राजकमल चौकातून 4 ऑक्टोबर 2016 रोजी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास दुचाकीच्या डिकीतून 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यांना गुरूवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. देवरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावल तालुक्याती केळीचे व्यापारी शेख अश्पाक शेख कमलोद्दीन (वय 39) यांनी 4 ऑक्टोबर 2016 रोजी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास राजकमल चौकात दुचाकी (क्र. एमएच-19-बीडी-4189) लावली. दुचाकीच्या डिकीत ठेवलेले 1 लाख 80 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटकेत असलेल्या विकास उर्फ हाड्या राजू गुमाने (वय 23), बल्लू उर्फ टारझन दहेकर (वय 30) यांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांना न्यायाधीश देवरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 23 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज गुरूवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे दोघांना न्या. एस.बी.देवरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोघांना न्या. देवरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.