41 लाख रुपये वसूल केले जाणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या डिझेल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या दोन कर्मचार्यांना पुन्हा महापालिका सेवेत घेण्यात आले आहे. अपहार केलेल्या रक्कमेपैकी 15 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले असून आणखी 41 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. बाबासाहेब राठोड आणि गणेश देशपांडे अशी या कर्मचार्यांची नावे आहेत.
महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागात सन 2008-09 मध्ये हा घोटाळा घडल्याचे समोर आले होते. ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आरोग्य विभागातून डास मारण्यासाठी धुरीकरणाचा वापर करण्यात येतो. त्या धुरीकरणासाठी जादा डिझेल वापरुन 1 लाख 13 हजार 499 लिटरचा डिझेल घोटाळा करण्यात आला. त्या घोटाळ्यातील सुमारे 54 लाख 16 हजार 972 रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. याबाबत आरोग्य निरीक्षक बी. आर. राठोड व गणेश देशपांडे यांना निलंबित करुन खातेनिहाय चौकशी करण्यात आली.
पालिकेचे आर्थिक नुकसान
दरम्यान, निलंबनाच्या कालावधीत त्यांना दिल्या जाणार्या निर्वाह भत्त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांना पुन्हा नोकरीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपहार झालेल्या रक्कमेपैकी 15 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले असून उर्वरित रक्कमेपैकी 27 लाख रुपये बाबासाहेब राठोड यांच्याकडून आणि 14 लाख रुपये गणेश देशपांडे यांच्याकडून त्यांच्या पगारातून वसूल केले जाणार आहेत.