डिप्लोमानंतरच्या अभियांत्रिकी पदवीच्या जागा निम्म्यावर

0

‘एआयसीटीई’चा निर्णय; 20 टक्के जागांचा कोटा 10 टक्के

पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या (पदवी) दुसर्‍या वर्षाच्या प्रवेशासाठी असलेला 20 टक्के जागांचा कोटा 10 टक्के केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाच्या सुमारे साडेदहा हजार जागा कमी झाल्या आहेत. जागा रिक्त राहात असल्याचे कारण देत हा निर्णय घेतल्याचे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या वतीने (एआयसीटीई) सांगण्यात येत आहे. ज्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी स्पर्धा होती, तेथील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संधी कमी झाल्या आहेत. थेट अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्यानेच अनेक महाविद्यालये ओस पडली आहेत. अभियांत्रिकी पदविका पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षाला गुणवत्तेवर प्रवेश मिळत असल्याने तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात मोठी होती. या जागा निम्म्यावर आल्याने आता पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवी महाविद्यालये, तसेच ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांत जागा रिक्त राहात होत्या. मात्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वीर जिजामाता अभियांत्रिकी संस्था यांसारख्या नावाजलेल्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी शेकडो विद्यार्थी इच्छुक असतात. या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

तीन वर्षांनी अंमलबजावणी व्हावी

मुळात हा निर्णय योग्य नाही. त्यामुळे सध्या डिप्लोमाला असणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. आता निर्णय जाहीर झाल्यानंतर तीन वर्षांनी अंमलबजावणी करायला हवी होती. त्यामुळे डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेत माहिती मिळाली असती. तीन वर्षांनी अंमलबजावणी झाली, तरच ते नैसर्गिक न्यायाला धरून होईल, असे शैक्षणिक समुपदेशक विवेक वेलणकर यांनी स्पष्ट केले. याचे दुरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. डिप्लोमाऐवजी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या यामुळे
वाढणार आहे. आपसूकच खासगी क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. सीओईपीसारख्या गुणवत्तापूर्ण महाविद्यालयातील प्रवेशाच्या संधी घटणार असून गुणवत्तेत ‘क’ दर्जाच्या महाविद्यालयांत दुसर्‍या वर्षाला नाइलाजाने प्रवेश घ्यावा लागेल.