डीआरएम यांना पाहताच अवैध विक्रेत्यांनी ठोकली धूम

0

डीआरएम आर.के.यादव यांनी भुसावळ रेल्वे स्थानकासह यार्ड सुरक्षेचा घेतला आढावा ; चोरटे मार्ग तातडीने बंद करण्याचे आदेश; रेल्वे यार्डासह स्थानकावरील वापरात नसलेली कॅबीन पाडा ; सीसीटीव्ही पाहून विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश

भुसावळ- रेल्वे यार्डातील जुनी कॅबीन जमीनदोस्त करण्यासह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकजवळ असलेली जुनी न वापरातील कॅबीन सुध्दा तोडण्याचे आदेश भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी बुधवारी दुपारी दिले. यादव यांनी अचानक रेल्वे स्थानकासह यार्डाची पाहणी करून सुरक्षेबाबत आढावा घेतला. डीआरएम यांच्यासह अधिकार्‍यांचे पथक रेल्वे स्थानकावर धडकताच अनधिकृत विक्रेत्यांनी धूम ठोकली तर रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षातूनही डीआरएम यांनी अनधिकृत विक्रेत्यांना हुडकून काढत आरपीएफला तातडीने कारवाईचे आदेश दिले.

अवैध मार्ग तातडीने बंद करा
पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर भारताने बुधवारी केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेची बुधवारी सकाळी 10 वाजेपासून यादव यांनी पाहणी केली. रेल्वे यार्ड आरपीएफ ठाण्याजवळील रस्ता तातडीने बंद करण्याच्या त्यांनी सूचना करीत रेल्वे स्थानकात प्रवेशाचे अवैध मार्ग असल्यास ते देखील बंद करावेत, असे आदेश दिले शिवाय या सूचनांची अंमलबजावणी झाली वा नाही याबाबत आठवडाभरात पुन्हा आढावा घेणार असल्याची तंबीही त्यांनी दिली. रेल्वे सुरक्षा बलाला डोळ्यात तेल घालून गस्त घालण्याच्या सूचना यादव यांनी करीत संशयीतावर नजर ठेवण्याच्याही सूचना केल्या.

या अधिकार्‍यांची होती उपस्थिती
रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त अजय दुबे, वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, मंडळ अभियंता (मुख्यालय) एच.के. शर्मा, मंडळ अभियंता एम.एस.तोमर, स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, राजेद्र देशपांडे, सुदर्शन देशपांडे, एसीएम अजयकुमार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.