पुणे : एकेकाळी डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास शिक्षकाची नोकरी मिळत होती. परंतु, आता डीएड झालेल्यांना शिपायाचीही नोकरी मिळत नसल्याने, वाढती बेरोजगारी पाहाता विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. यंदा डीएडसाठी 60 हजार जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली गेली होती. पैकी, 50 हजार जागा रिक्त असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. 31 मेरोजी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली होती. तर पाच टप्प्यात 31 जूनपर्यंत ही प्रक्रिया राबविली गेली. 60 हजारपैकी केवळ 10 हजार 800 प्रवेशअर्ज आले असून, केवळ 9 हजार 846 विद्यार्थ्यांनी अखेरच्या टप्प्यात प्रवेशासाठी अनुकूलता दर्शविली आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने डीएडसाठी अध्यापनाचे कार्य करणार्या प्राध्यापकांच्या नोकर्याही धोक्यात आल्या असून, ते अतिरिक्त ठरत आहेत. त्यांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सरकारनेही ठोकले डीएड महाविद्यालयांना टाळे
विद्यार्थ्यांनी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याने संबंधित प्राध्यापकांच्या नोकर्यांचा प्रश्न गंभीर झाला असून, त्यातही विनाअनुदानित महाविद्यालयांत तर क्वचित प्रवेश होत आहेत, अशी चिंता टिळक डीएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. राधिका इनामदार यांनी व्यक्त केली. काही विनाअनुदानित डीएड महाविद्यालये बंद करावी लागली असून, त्यातील प्राध्यापकांच्या पगाराची गहन प्रश्न निर्माण झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्या डीएड महाविद्यालयांना सरकारी अनुदान मिळते, त्या महाविद्यालयांतही फारच कमी संख्येने प्रवेश घेतले जात आहेत. त्यामुळे तीन वर्षांचा आढावा घेऊन सरकारने यापैकी बहुतांश महाविद्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नियमाप्रमाणे 100 विद्यार्थ्यांमागे दोन प्राध्यापक असायला हवेत. सद्या प्रत्येक तुकडीत सरासरी 50 विद्यार्थीही भरत नाहीत. त्यामुळे प्रत्येक तुकडीमागे सहा प्राध्यापकांच्या नोकर्या जात आहेत.
डीएडधारकांना नोकर्याच नाहीत!
दशकभरापूर्वी डीएडकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा होता. अगदी डोनेशन देऊन प्रवेश घ्यावा लागत होता. राज्यभरात 949 सरकारी डीएड महाविद्यालये होती. परंतु, आता विद्यार्थीच मिळत नसल्याने यापैकी बहुतांश बंद पडली आहेत. डीएडनंतर द्यावी लागणारी टीईटी वैगरे परीक्षांतून नोकरीसाठी मोठी गळती लागत असल्याने, तसेच नोकरीची काहीच शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरवली असून, इतर अभ्यासक्रमांकडे आपला मोर्चा वळविला आहे.