पुणे : प्रतिनिधी – कुलकर्णी दांपत्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे शनिवारी त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही, न्यायालयाने जामिनावरील पुढील सुनावणी 12 एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा येरवडा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. तसेच डीएसकेडीएल या कंपनीच्या एका भागधारकाने डीएसके हे कंपनीची मालमत्ता विकू शकत नाहीत, यासंबंधी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरही 12 एप्रिलरोजी सुनावणी होणार आहे.
मालमत्तेची मालकी भागधारकांची!
डी. एस. कुलकर्णी यांनी डीएसकेडीएल या कंपनीची मालमत्ता विकायची आहे, असे न्यायालयाला सांगितले होते. दरम्यान, डीएसकेडीएल ही प्राईव्हेट लिमिटेड कंपनी आहे. कंपनीच्या मालमत्तेची मालकी भागधारकांची असते. डीएसके वैयक्तीक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाही, याबाबत तिसरा पक्ष म्हणून 39 लाख 50 हजार रुपयांचे भागधारक असलेल्या चंदर भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे. अॅड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत हा अर्ज करण्यात आला. यावर पुढील सुनावणीच्या वेळी 12 एप्रिलरोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेतली जाणार आहे.
न्यायालयात गुंतवणूकदारांची उपस्थिती
एकंदरित, याप्रकरणात डीएसके यांच्या जवळपास सर्व मालमत्ता पोलिसांच्या तपासात समोर आल्या आहेत. यातल्या बहुतांश मालमत्तावर बँकांचे कर्ज आहेत. काही कंपन्या या पब्लिक लिमिटेड आहेत. त्यामुळे मालमत्ता विकण्याचा डीएसकेंचा मार्ग बंद होत चालला आहे. शनिवारी डीएसकेच्या जामिनावरील सुनावणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार न्यायालयात हजर होते. आपली गुंतवणूक केलेली रक्कम कशा प्रकारे मिळेल याचीच माहिती हे गुंतवणूकदार घेत होते.