डीएसके : कोल्हापूर, सांगलीतही कारवाई

0

पुणे । कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या डीएसके ग्रुपच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने 260 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले असून, कोल्हापूर आणि सांगलीतील सुमारे 10 कोटींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. डिएसकेंच्या दोन जिल्ह्यांतील मालमत्तेची पोलीस कागदपत्रे जमवत आहेत. दीपक सखाराम कुलकर्णी यांच्यासह पत्नी व मुलगा अशा तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

260 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले
जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी डीएसके समूहात 50 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. दीड वर्षापासून गुंतवणूकदारांना पैसे मिळालेले नाहीत. 10 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमा अडकून पडल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातही राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला होता. आर्थिक शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी 260 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले आहेत.

विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी
ठेवीदारांच्या सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्याकडे अडकल्या असून, याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तसेच, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांसह राज्य सरकारची न्यायालयात कायदेशीर बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची (एसपीपी) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पुणे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने राज्य सरकारकडे दाखल केलेला आहे. अशाप्रकारे विशेष वकिलांची नियुक्ती केली गेली तर ते सरकार पक्षाची बाजूही मांडतील व पुणे पोलिसांच्यावतीने न्यायालयात खटलाही लढवतील, असे आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रकरणात डीएसकेंना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला होता.

पुणे पोलिसांकडून 45 कोटींचा बोज्याची नोंद
260 गुंतवणूकदारांच्या जबाबानुसार 20 कोटी रुपयांची रक्कम अडकली आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी डीएसकेच्या मालमत्तांचे पंचनामे केले आहेत. यात कोल्हापूर आणि सांगलीतील मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय सोलापूर येथील मालमत्तेचाही लवकरच पंचनामा होणार आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील मालमत्ता परस्पर विकली जाऊ नये, यासाठी मालमत्तेवर आर्थिक बोजा चढवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती तपास अधिकारी राजेंद्र शेडे यांनी दिली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील मालमत्तेवर यापूर्वीच पुणे पोलिसांनी 45 कोटींचा बोजा नोंद केला आहे. आता कोल्हापूर पोलिसांनी 20 कोटींचा बोजा चढवला आहे.

राज्य सरकारला संपूर्ण माहिती सादर
डीएसकेप्रकरणात अनेक आर्थिक गैरप्रकार पुढे येत असून, या सर्व घटनाक्रमासह पुराव्यांची कायदेशीर मांडणी करावी लागणार आहे, त्यासाठी खास सरकारी वकिलांची गरज आहे. याप्रकरणी एसपीपी नियुक्त करण्यात आल्यात न्यायालयात सक्षम केस उभी करण्यासाठी पोलिसांना मोठे सहाय्य होऊ शकते. राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात या खटल्याशी संबंधित सर्व वस्तुस्थितीची माहितीही सरकारला देण्यात आलेली आहे. तसेच, डीएसकेंविरुद्ध दाखल गुन्हे, वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले एफआयआर यांचीही माहिती सरकारला कळविण्यात आलेली आहे.