वैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीत सर्व रिपोर्ट नॉर्मल
पुणे : ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांची प्रकृती आता ठीक असून, त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे सर्व रिपोर्ट सामान्य आले आहेत. त्यामुळे पोलिस त्यांची चौकशी करण्यास मोकळे आहेत, असा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने दिला आहे. या अहवालानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने डीएसकेंना दीनानाथ रुग्णालयातून पुन्हा ससून रुग्णालयात हलविले होते. शुक्रवारी सकाळी ससूनमध्ये डीएसकेंच्या सीटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासण्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. हे रिपोर्ट घेऊन पोलिसांनी न्यायालयात ते सादर केल्यानंतर न्यायालयाने डीएसकेंना पुन्हा 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
डीएसके पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
ठेवीदारांच्या फसवणुकीसह इतर गंभीर गुन्हे डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाचे अटकपूर्व संरक्षण संपुष्टात येताच, पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलकर्णी दाम्पत्याच्या दिल्लीतून मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर फरसखाना पोलिस कोठडीत असताना डीएसके यांना गत शनिवारी भोवळ आल्याने ते कोसळले होते, त्यांच्या डोक्याला थोडा मारही लागला होता. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य केल्यानंतर डीएसकेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तसेच पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी डीएसकेंना पुन्हा ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी सर्व तपासण्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला. डीएसकेंची प्रकृती ठीक असून, पोलिस त्यांची चौकशी करू शकतात, असा अहवाल डॉक्टरांनी दिला असल्याचे सांगण्यात आले.
प्रकृती बिघडल्यास रुग्णालयात नेता येणार!
फसवणूकप्रकरणी तुरुंगात जाण्याची नामुष्की आल्याने मानसिक धक्का बसलेले डीएसके यांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याचा अहवाल दोनच दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय बोर्डाने दिला होता. त्यानुसार डीएसकेंवर वैद्यकीय उपचारही सुरु होते. शुक्रवारी मात्र डीएसके ठीक असल्याचा अहवाल याच वैद्यकीय बोर्डाने दिला आहे. त्यामुळे या अहवालानंतर जिल्हा न्यायालयाने डीएसकेंना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले असून, 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, प्रकृती बिघडल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परवानगीही देण्यात आली आहे. पोलिस त्यांची ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी कसून चौकशी करणार आहेत.
ठेवीदारांचे पैसे शिरीषच्या खात्यात वळविले!
डीएसकेंच्या अटकेनंतर त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. त्याच्या बँक खात्यात गुंतवणूकदारांचे 163 कोटी रुपये जमा करून त्याचा उपयोग मनमानी पद्धतीने आणि वैयक्तिक मालमत्ता खरेदीसाठी केलाचा दावा करुन पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामीनअर्जाला विरोध केला आहे. गुंतवणूकदारांच्या दोनशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्याच एफआयआरमध्ये शिरीषही आरोपी असल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेपैकी 163 कोटी रुपये हेमंती यांच्या बँक खात्यातून शिरीषच्या खात्यात वळवण्यात आले. यापैकी 34 कोटी रुपयांचा उपयोग करून पुण्यातील हवेली तालुक्यातील टाकवी येथे जमीन खरेदी करण्यात आली आणि नंतर तीच जागा डीएसके यांच्या डीएसके मोटर्स कंपनीला प्रतिमहा 48 लाख रुपये भाड्याने देण्यात आली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.