परिसरात 15 दिवसांपासून वीज नाही
आकुर्डी : –येथील महापालिका दवाखान्याच्या बाजुला असलेल्या महावितरणच्या डीपी बॉक्सच्या शेजारी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. आकुर्डी परिसरात गेल्या 15 दिवसांपासून वीज नाही. या अतिक्रमणामुळे महावितरणच्या कर्मचार्यांना डीपी बॉक्सची दुरुस्ती करण्यात अडचणी येत असून परिसरातील नागरिकांना विनाकारण त्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
आकुर्डी येथील महापालिका दवाखान्याच्या बाजुला एक डीपी बॉक्स आहे. या डीपी बॉक्सच्या आसपास फळ विक्रेते, चर्मकार यांनी अतिक्रमण केले आहे. या विक्रेत्यांकडून त्यांचे सामान या डीपी बॉक्समध्ये ठेवले जाते. आकुर्डी परिसरात गेल्या 15 दिवसापासून वीज नाही. सध्या उन्हाळा सुरु असून त्यात वीज नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नेमका काय दोष आहे हे पाहण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांना या डीपी बॉक्सची पाहणी करण्यात या अतिक्रमणामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्वरित कारवाई न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.