डीपी रस्त्याचा आराखडा सादर करा

0

वारजे । वारजे-माळवाडी परिसरात प्रस्तावित असलेल्या पीएमआरडीच्या बाह्यवळण रस्त्याचा (डीपी) अंतिम आराखडा या महिन्याच्या अखेरपर्यंत (दि.30 सप्टेंबर) तयार करण्याचा निर्णय महानगर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. स्थानिक नगरसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे रस्ता बाधितांना दिलासा मिळाला आहे.

पीएमआरडीचे आयुक्त किरण गीते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अतिरिक्त जिल्हा अधिकारी राजेंद्र मुठे, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, नगरसेवक दिलीप बराटे, दिपाली धुमाळ, सचिन दोडके, सायली वांजळे, भूसंपादन विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निर्णय घेण्यासाठी मुदत
यावेळी देशभ्रतार यांनी सर्व तांत्रिक बाजू समजून घेत, चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत, सल्लागार कंपनीने काय काम केले? इतर सर्व सर्वे झालेत का? असे प्रश्‍न विचारून अधिकार्‍यांना खडसावले. याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी लागेल अशी मागणीही त्यांनी केली. या रस्त्याबाबत महापालिका, महानगर प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आणि सल्लागार कंपनीचे अभियंता आणि तंत्रज्ञ यांनी एकत्र मिळून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, आयुक्त किरण गीते यांनी सांगितले. सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण विचार करून व्यवहारिक तोडगा काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. याविषयी 30 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सध्याचा बहुतांशी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्युडी) विभागाच्या तत्त्वावर चाललेला असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र नव्याने अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होतील असे त्यांनी सांगितले.

रस्ता नदी आणि नागरी वसाहतीतून
प्रस्तावित रस्ता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, वन विभाग, जैव विविधता उद्यान (बीडीपी), नदी आणि नागरी वसाहतीतून जात असल्याचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी सांगितले. तिथे पूर्वी पुणे-कोल्हापूर रस्ता प्रस्तावित होता. मात्र तो रस्ता रद्द केला होता. आता पुन्हा महानगर प्राधिकरणाने त्यात किरकोळ बदल करून, रस्त्याचा आराखडा मांडला आहे असे सांगून बराटे यांनी एनडीए या रस्त्याला हरकत घेऊन एनजीटी न्यायालयात जातील असे स्पष्ट केले. कोणताही निर्णय सामान्य नागरिकांच्या विरोधात असेल तर त्याला आक्षेप असल्याचे सांगत, याचा आराखडा तयार करताना तो शासनाच्या कलम 37च्या नियमात बसवून पूर्ण करण्याची मागणी बराटे यांनी यावेळी केली. त्याला देशभ्रतार यांनी देखील दुजोरा दिला.

बीडीपीमध्ये आराखडा कसा?
बीडीपीमध्ये विकासकामे करता येत नाहीत. मग रस्त्याचा आराखडा कसा? असा सवाल सचिन दोडके यांनी केला. काही दिवसांपूर्वीच नवीन नकाशा प्रसिद्ध केला असल्याचे सायली वांजळे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात अनेकजण न्यायालयात जातील असे सांगून सर्वांनीच या रस्त्याला जोरदार हरकत घेतली. प्रशासनाने मांडलेला भुयारी मार्गाचा प्रस्ताव देखील यशस्वी होऊ शकणार नाही, असे यावेळी नमूद करण्यात आले.