मुख्याध्यापक म्हणून जे.बी.राणेंकडे पदभार ; तक्रार अर्जाला मंजुरी
भुसावळ– पालिकेच्या डी.एस.हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून राजश्री सपकाळे यांची 42 जणांना डावलून झालेली निवड जिल्हाधिकार्यांनी बेकायदेशीर ठरवत त्रयस्थ तक्रारदार व पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांचा तक्रार अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन सत्ताधार्यांनी 3 मार्च 2014 रोजी केलेला सर्वसाधारण सभेतील ठरावही रद्द ठरवल्याने तत्कालीन सत्ताधार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकार्यांनी केला ठराव रद्द
डी.एस.हायस्कूलच्या मुख्याध्यापिकापदी राजश्री सपकाळे यांची तत्कालीन सत्ताधार्यांनी वर्णी लावली होती मात्र त्यांच्यापेक्षा पात्र असलेल्या 42 जणांना डावलून ही नियुक्ती झाल्याचा आरोप करीत पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. ती जिल्हाधिकार्यांनी मंजूर करून घेतली असून तत्कालीन सत्ताधार्यांनी 3 मार्च 2014 रोजी केलेला सर्वसाधारण ठराव रद्द ठरवत विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तरतूद ठेवली आहे. तूर्त या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार जे.बी.राणे सांभाळत आहेत.
उच्च न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने -सपकाळे
शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आपण खंडपीठात याबाबत दाद मागितली होती. खंडपीठाने आपल्यालाच पदावर कायम ठेवावे या संदर्भात आदेश दिला असून राणे यांच्या निवडीला ‘स्टे’ ऑर्डर दिली आहे.