समाज प्रबोधनाच्या कार्यात करणार मदत
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) या सामाजिक संस्था शहरातील तरुण पिढीला पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी काम करते आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात शालेय जीवनातच पर्यावरण विषयाची गोडी व आकर्षण निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. इसिए अंतर्गत सुरु असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांना शहरातील महाविद्यालयातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संवर्धनाच्या कामासाठी डॉ. डी. वाय. कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने इसिए सोबत पर्यावरण संवर्धन विषयक सामंज्यस्य करार केला आहे. हा करार सन 2018 ते 2023 पर्यंत असेल. प्रसंगी महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. मोहन वामन आणि इसिएतर्फे विकास पाटील यांनी करारावर सह्या केल्या.
संवर्धनाचे महत्व शिकवावे लागते
इसिएचे विकास पाटील यांनी सांगितले की, आज समाजामध्ये अनेकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व शिकवावे लागते आहे. त्यासाठी डी. वाय. पाटील महाविद्यालय आवश्यकते नुसार व पर्यावरणाच्या प्रदूषणास नियंत्रित ठेवण्यासाठी एकत्रित येवून समाजात जनजागरण, लोकशिक्षण व प्रबोधन करण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा जेव्हा नकळत काही प्रचलित चालीरिती अथवा प्रथांमुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीच्या नियंत्रणाच्या कार्यात एकत्रित शिस्तबद्ध आणि शास्त्रीय दृष्टीकोना पद्धतीने पुढाकार घेवून ती आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करणे. स्थानिक प्रशासनाच्या समाज प्रबोधनाच्या कार्यात नेहमी सहभागी होणे, आदी महत्वाच्या गोष्टींसाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने करार केला आहे. ते वेळोवेळी सहकार्य करणार असून महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्या जनजागरण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन वामन, इसिए चेअरमन विकास पाटील, विश्वस्थ विश्वास जपे, प्रभाकर मेरुकर, गोविंद चितोडकर, अनघा दिवाकर, प्रा. मुकेश तिवारी, प्रा. अंजली आकीवते, प्रा. खालिद शेख, प्रा. गणेश फुंडे, डॉ. मीनल भोसले आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांना इसिएतर्फे भारतीय वंशाच्या झाडांच्या बियांचे बॉक्स देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. विश्वास जपे यांनी सर्वांचे आभार मानले.