75 स्वयंसेवकांनी उपक्रमात नोंदविला सहभाग
पिंपरी-चिंचवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर रॅली व सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरीतील संत तुकारामनगर, महेशनगर तसेच वल्लभनगर या परिसरात साक्षरतेविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. तसेच, परिसरातील घराघरात जाऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी, शैक्षणिक बाबींमध्ये आपला विभाग किती विकसित आहे, साक्षरतेचे प्रमाण आपल्या विभागात किती आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले.
साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले
समाजातील अशिक्षित व अल्पशिक्षित लोकांपर्यंत दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व पोहचावे, त्यांना शिक्षणाचे फायदे कळावेत, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या 75 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी रॅली दरम्यान साक्षरतेविषयी जनजागृती करत लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच सर्वेक्षणाद्वारे आपल्या विभागाच्या विकासाविषयी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.
दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न
या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, यासाठी सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यावर प्रतिष्ठानचा भर असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्या प्रतिष्ठान सोसायटीमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात, या विषयीदेखील त्यांनी माहिती दिली. रॅलीचे आयोजन संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली वाघुले उपस्थित होत्या.