डी.सी.सी. बँकेच्या प्रकरणात निकालाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे

0

परळी : संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या कर्जाच्या संदर्भात अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा असे कोठेही म्हटलेले नाही तर सुतगिरणीच्या सर्व संचालकांची अर्जात नमूद केलेली प्रॉपर्टी विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच हा निकाल अंतिम नसून अंतरिम आहे. या संबंधी आम्हाला हजर लावून म्हणणे सादर करून आधी नोटीस प्राप्त व्हायला हवी होती, सदर नोटीस प्राप्त झालेली नाही, सदर नोटीस प्राप्त होताच आम्ही न्यायालयात हजर राहून हा आदेश रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देत राहु असे ना. मुंडे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. सुतगिरणीच्या खटल्यात 17 संचालक आहेत, 17 संचालकांपैकी मी एक संचालक आहे. आजपर्यंत या प्रकरणात, तपासात संपुर्ण सहकार्य केलेले असून यापुढेही कायदेशीर मार्गाने आपला लढा सुरूच राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.

आपण वर सांगितलेली वस्तुस्थिती खरी असताना आपले नेहमीचे विरोधक न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माध्यमांनी कृपया त्यांनी दिलेल्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची माहिती घेऊन बातम्या द्याव्यात असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

डी. सी. सी. बँक ज्यांनी बुडवली आणि चार वर्ष कारावासही भोगला ते महारथी भाजपाचेच कार्यकर्ते, नेते आहेत, आणि आजही ते पालकमंत्र्यांसोबत जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. हे संपुर्ण जिल्ह्याला माहित असताना न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करणार्‍यांचा हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे ‘ असा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.