डेंग्यू रूग्ण आढळल्यावर प्रशासन जागे

0

शहादा । शहर व तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली असून आतापर्यंत शहरात तीन लहान मुल व दोन पुरुष असे पाच रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. तर मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण नागरिकांना झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या ता.18 पासून शहरात 18 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने धुरळणी, फवारणी व औषधांची फवारणी घरोघरी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मलेरिया अधिकारी रविंद्र ढोले यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात डेंग्यू सदृश्य साथीचे रुग्ण आढळले आहेत. सुरुवातीला हा साधा मलेरिया असल्याचे निदान खाजगी रुग्णालयांकडून करण्यात येवून त्यावर उपचार केले जात होते. मात्र गेल्या काही दिवसात या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत. आतापर्यंत डेंग्यू सदृष्य रुग्णांच्या संख्येने रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत. तर शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांसह औषधांची कमतरता असल्याने नागरिकांना या जीवघेण्या रोगावर इलाज करण्यासाठी खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत असून नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कोरडा दिवस पाळणार
जिल्हा मलेरिया अधिकारी श्री. ढोले म्हणाले की, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असून तो दिवसा चावतो. या डासापासून डेंग्यूची लागवण होते. याला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम घरातील स्वच्छ पाण्याची साठवण केलेले भांड्यांची काळजी घेतली पाहिजे. ते व्यवस्थीत झाकलेले असावे तसेच यातील पाणी किमान दोन दिवसाआड बदलले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. शहरात उद्या ता.18 पासून धुरळणी यंत्राद्वारे फवारणी करण्यात येणार असून एमीफॉस्ट व बीटीआय औषधांची फवारणी केली जाणार आहे. गटारींमध्येही औषधी टाकण्यात येणार आहे. प्रशासन डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून यात नागरिकांचेही सहकार्य अपेक्षीत आहे.

नागरिकांमध्ये केली जाणार जनजागृती
मलेरिया विभागाचे 14 व पालिकेच्या आरोग्य विभागातील चार अशा 18 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने विशेष मोहिम शहरात राबवली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने या जिवघेण्या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व या आजारापासून बचाव करण्यासाठी शालेय विद्यार्थी, स्काऊट, एनएसएस व एनसीसीसीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती अभियान राबवली जाणार असून एक विशेष माहितीपत्रक प्रत्येक घरी पोहचविले जाणार आहे. सर्वप्रथम शहरात ही मोहिम राबवली जाणार असून ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांच्या मदतीने ही मोहिम राबवली जाणार आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या मोहिमेला साथ द्यावी व डेंग्यूला शहरातून हद्दपार करण्यासाठी मदत करावी असे आवाहन श्री. ढोले यांनी केले आहे.

उपाययोजनेवर देणार भर
शहरातील स्वयंसेवी संस्था व वृत्तपत्रांतून या जिवघेण्या आजाराबाबत माहिती आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खळबडून जागी झाली असून आज पालिका कार्यालयात जिल्हा मलेरिया अधिकारी रविंद्र ढोले, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी गजानन सावरे, पालिकेचे आरोग्य अधिकारी रविंद्र चव्हाण, पाणीपुरवठा अभियंता श्री. जावरे, स्थानिक मलेरिया अधिकारी डॉ. गिते, नगरसेवक लक्ष्मण बढे, नागरी हितसंघर्ष समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी, गौरीशंकर बोरसे, नगीन गुरव, मनोज गुरव, माजीद बागवान यांची बैठक होवून शहरात उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

नियमित स्वच्छता होत नसल्याने मलेरिया, डेंग्यू अशा विविध साथीच्या आजारांची लागण लहान बालकांपासून मोठ्या नागरिकांना होत आहे. तक्रारी केल्यानंतर पालिकेच्या आरोग्यविभागाच्या कर्मचार्‍यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. या उलट अरेरावीची भाषा वापरुन उध्दट उत्तरे दिली जातात. विशेष स्वच्छता अभियान राबवून सर्व गटारींची स्वच्छता करण्यात यावी. स्वच्छता ठेकेदारावर कामात हलगर्जीपणा केल्यामुळे कठोर कारवाई करण्यात यावी.
– यशवंत चौधरी
अध्यक्ष,नागरी हितसंघर्ष समिती