डेंग्यू सदृश वाढत्या रूग्ण संख्यने नागरिकांमध्ये भितीसह दहशत

0

धुळे । शहरात डेंग्यूचे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे. नागरी वसाहतींमध्ये स्वच्छता मोहिम थांबल्याने पसरलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यु तापाची साथ पसरली आहे. देवपुर, मोहाडी उपनगर,मिलपरीसर ,मोगलाई, जुनेधुळे या भागात स्वच्छता अभावी डेंग्यूचे रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मोहाडी,जुने धुळे या भागात डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत. डेंग्युच्या संशयीत रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. ठिकठिकाणी पसरलेल्या घाणीमुळे व साचलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने पातळीवर स्वच्छता मोहिमेला गती देण्याची गरज आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषधांची फवारणी आवश्यक आहे.

ऑगस्टमध्ये 17 रूग्ण पॉझिटिव्ह
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा फैलाव झालेला आहे. यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात 95 संशयित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 17 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचे रूग्ण आढळून आले. यात 50 संशयित रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील अहवालाची प्रतीक्षा आहे.

मनपातर्फे फवारणी, धुरळणी
ज्या भागात डेंग्यूचा पॉझिाटिव्ह रूग्ण आढळला त्या भागात कीटक सर्वेक्षण करण्यात येते. तो कीटक, डास कुठल्या प्रकरचा आहे, याचा शोध घेऊन, त्यानुसार उपाय योजना करण्यात येत आहेत. डेंग्यू, मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात कंटेनर सव्र्हे, फवारणी, धुरळणी केली जात आहे. यासाठी नऊ पथके तयार करण्यात आलेले आहेत. एका पथकात आठ-नऊ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील काही कर्मचारी धुरळणी-फवारणी करतात. तर काही कर्मचारी कंटेनर तपासणी करीत असल्याचे समजते .

नागरिकांमध्ये जनजागृती
आरोग्य विभागाने नागरिकांना तत्परतेने उपचारासाठी पथक तयार केले आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांची होणारी वाढ नष्ट करण्यासाठी स्वच्छता मोहिम सुरू केली आहे. तापाची साथ पसरू नये यासाठी नागरिकांना उपाय सूचविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले असून, त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले होते. त्यांचे रक्तजल नमुने वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांच्याकडून अहवालाची प्रतीक्षा आहे.
– अपर्णा पाटील, जीवशास्त्रज्ञ,
मलेरिया विभाग, धुळे